BULDHANAHead linesVidharbha

धान्याचा पुरवठा ठप्प! शालेय पोषण आहार बंद!!

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण? सरकार की ठेकेदार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग १ ते ८ व्या वर्गापर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे नीट पोषण झाले पाहिजे, या हेतूने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. परंतु शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात शाळास्तरावर तांदुळाचा पुरवठा न केल्यामुळे चिखली तालुक्यातील बहुतेक शाळांमध्ये पोषण आहार योजना ठप्प पडली आहे. शासनाकडून तांदुळाचा पुरवठा न झाल्याने अशी स्थिती थोड्याफार फरकाने पूर्ण राज्यात निर्माण झाली आहे.

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सुरवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार प्रत्येक महिन्याला ३ किलो तांदुळाचे तयार पाकीट दिल्या जात होते. त्या नंतर या योजनेत बदल करून खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत दिल्या जात होती. यात पूरक आहार म्हणून केळी, अंडीसुद्धा दिल्या जात होती. त्यात अधिक सुधारणा करून मध्यान्ह भोजन योजना अधिक पोषक करून विविध डाळी, पालेभाज्या या आहारात देणे सुरू झाले. यातून खरोखरच विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत होता. या योजनेच्या पुढील टप्प्यात तांदुळासह तूरडाळ, मुंगडाळ, बरबटी, चना, वाटाणा शासनाकडूनच पुरविल्या जाऊ लागला. यात व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांद्वारा किंवा केंद्रीकृत किचन योजनेअंतर्गत काही शहरी भागात कंत्राटदार नेमून एकाच ठिकाणी अन्न शिजवून त्याचे वितरण करण्याची पद्धत सुरू आहे.

या सर्व प्रकारामध्ये धान्य शासनाकडूनच पुरविल्या जाते. मागील महिन्यात आवश्यक तांदळाचा पुरवठा न करता फक्त अर्धे तांदूळच पुरविल्या गेले. त्याआधी शासनाने प्रत्येक शाळेत किती तांदुळाचा साठा शिल्लक आहे. याची ऑनलाईन माहिती गोळा केली होती. तरीही पुरेसा धान्य पुरवठा शासनाकडून करण्यात आला नाही. ज्या शाळेचे धान्य संपले आहे. त्या शाळेला खुल्या बाजारातून खरेदी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे धान्य संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे बंद करण्याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांजवळ दुसरा पर्याय नसल्यामुळे ही विद्यार्थी उपयोगी व न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेली योजना धान्याच्या पुरवठ्याअभावी बंद पडली आहे. या गंभीर बाबीची शासनस्तरावर तत्काळ दखल घेऊन धान्यादी साहित्याचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.


१ मार्चपासून जिल्हा परिषद शाळा बोरगाव वसू येथे तांदूळ नसल्यामुळे शालेय पोषण आहार वाटप बंद आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहत असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शाळेला तांदुळाचा साठा उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहणार नाही.
– नागरे मॅडम, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा बोरगांव वसू
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!