सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी सन २०२२- २३ या आर्थिक वर्षासाठी कामे करूनदेखील पैसे मिळत नसल्यामुळे ओरड केली जात आहे. त्यामुळे सध्या दलित वस्ती सुधारणा योजनेची तिजोरी खाली झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
सन २०२२ – २३ या वर्षासाठी दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी जवळपास सोलापूर जिल्ह्यातील ५२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी जवळपास पहिल्या टप्प्यात २२ कोटी रुपये मिळाले आहेत. हे पैसे तालुक्याला वितरित करण्यात आले आहेत. परंतु आणखीन जवळपास ३२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळालाच नाही. त्यामुळे दलित वस्ती सुधारणा योजनेच्या तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता तिजोरी मध्ये पैसे नसताना विकास कामांना प्रशासकीय मंजूरी दिल्याच कशा असा प्रश्न निर्माण होत आहे. दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता, बंदिस्त गटार, पेविंग ब्लॉक, वॉल कंपाऊंड, पाणी पुरवठा करणे, बोअर घेणे, समाज मंदिर दुरुस्ती करणे आदी कामे केली जातात. प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील दलित वस्ती योजनेतील बहुतांश कामे करून देखील पैसे मिळत नसल्याची ओरड केली जात आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या विकास कामासाठी जवळपास २२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित ३२ कोटीचा निधी आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही तालुक्याला वर्ग करू.
– सुनील खमीतकर, समाजकल्याण अधिकारी जि.प.