राहुल गांधींच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष एकवटले!
– ‘संसद ते सडक’ देशभर मोदी सरकारविरोधात निदर्शने!
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या लोकसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर देशभरातील सर्व विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यासाठी एकत्र आल्याचे सकारात्मक चित्र देशभरात निर्माण झाले आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एकप्रकारे राहुल गांधी यांना राजकीय ताकद प्रदान केल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे. काँग्रेसपासून दूर राहणारे आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसदेखील कालच्या संसद ते सडक या देशव्यापी निदर्शने कार्यक्रमात एकत्र आल्याचे दिसून आले.
मोदी सरकारच्या निषेधार्थ सोमवारी देशभर निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आल्याचे चित्र असले तरी, काँग्रेसपासून दूर राहणारे आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसदेखील राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. सत्य बोलल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे देशभरात राहुल गांधी यांच्याविषयी सहानुभूती वाढली आहे. त्यातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा व स्वतः राहुल गांधी हे अत्यंत आक्रमकपणे मोदी सरकार व पंतप्रधान मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत असून, अदानी प्रकरणी पंतप्रधान मोदी यांची राजकीय कोंडी करण्यात या दोघा बहीण-भावांना यश आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात देशभर गांधी परिवाराविषयी सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता पाहाता, विरोधकांनीदेखील पुन्हा एकदा काँग्रेसच्या आश्रयाला येण्यास सुरूवात केली आहे.
वास्तविक पाहाता, भडकलेली महागाई, वाढलेले गॅस सिलिंडरचे दर, पेट्रोल-डिझेलचे दर, बेरोजगारी, देशातील धार्मिक व सांस्कृतिक उन्माद या जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने होणे अपेक्षित असताना, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल देशभर तीव्र निदर्शने केली जात आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला चालना देण्याची खेळी भाजप व संघपरिवाराने खेळून? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यात यश मिळवले असले तरी, त्यामुळे भाजप व काँग्रेस विरोधी पक्षांना मात्र पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वात येण्याची अपरिर्हता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, मोदी-अदानी या नावांनी काँग्रेसने कितीही शंखनाद केला तरी, बेरोजगारी, महागाई याप्रश्नांवरच लोकांची सहानुभूती काँग्रेस व विरोधकांना मिळेल, अशी शक्यताही राजकीयतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
——————
दाल में कुछ काला है,
इसीलिए मोदी सरकार JPC जॉंच से ङर रही है ! pic.twitter.com/fGA15qiZPB
— Mallikarjun Kharge (@kharge) March 27, 2023