मुंबई (विशेष प्रतिनिधी) – अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या माध्यमातून जोरदार धक्का बसला आहे. अॅड. सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली. डॉ. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचार्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा आरोप अॅड. सदावर्ते यांच्यावर करण्यात आला होता.वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते आता दोन वर्षांसाठी कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, किंवा कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.
मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनादरम्यान मीडियासमोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत, अॅड. सदावर्ते यांच्याविरोधात बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती. उच्च न्यायालयानेदेखील सदावर्ते यांच्याविरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता. वकिली करत असताना त्यांनी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. दोन वर्षासाठी आता सदावर्ते कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या निर्णयाला अॅड. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती आहे. अॅड. सदावर्ते यांच्यावर या आधीही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी त्या निर्णयाला आव्हान दिले होते.
यासंदर्भात बोलताना अॅड. सुशील मंचरकर म्हणाले, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनादरम्यान वकिलांचा गणवेश आणि बँड घालून आझाद मैदानात जल्लोष केला होता. तसेच त्यानंतर झालेल्या बैठकीतही वकिलांचा गणवेश परिधान करून ते सहभागी झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले. त्यामुळे यासंदर्भात मी बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. आज याबाबात बार कौन्सिलने निर्णय दिला असून त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे.
—————————