‘एलसीबी’ बुलढाणाचा पॅटर्नच वेगळा!; गुजरातच्या डाकोरमधून “छर्रा गॅंगला” बेड्या!
बुलडाणा (प्रशांत खंडारे) – खाकी वर्दी पावरफुल आहे. पावर दाखवली तर गुन्हेगारी,अवैध धंदे रोखणे शक्य होते. बुलढाणा एलसीबीच्या पावरफुल तपासाने २८ मार्च रोजी आंतरराज्यीय ‘छर्रा गँग’च्या सुत्रधारासह ६ गुन्हेगार जेरबंद केले. आरोपींवर विविध राज्यांत ३२ गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनात एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात गुजरातस्थित वडोदरा-गोधा महामार्गावर असलेल्या डाकोर नजीक ही कारवाई करण्यात आली. तर आरोपींच्या ताब्यातून तब्बल ६ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कौतुकास्पद कामगिरी असली तरी, बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह लावीत आहे. त्यामुळे बुलढाणा पोलिसांचा वेगळाच पॅटर्न असून सुजान नागरिकांना समजेनासा झाला आहे.
खामगांव शहरातील गांधी चौकात उभ्या असलेल्या अॅक्टीवा मोटार सायकलच्या डिक्कीतून १६ मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी ६ लाख रुपयांची चोरी केली होती. या टोळीने दिल्ली, राजस्थान,गुजरात,महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रातील खामगांव शहर, वाशिम,कारंजा,यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गुन्ह्यांना अंजाम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यात एकुण ३२ गुन्हे दाखल आहेत. १७ मार्च रोजी आनंदसागर (शेगांव) नजीक दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना अटक करण्यात यश मिळविले होते. तर यातील ७ आरोपी फरार झाले होते. दरम्यान पोलीस अंमलदार, गणेश पाटील,युवराज करुन तात्काळ अहमदाबाद (गुजरात) राठोड,गजानन गोरले, विजय सोनोने या एलसीबी पथकाने आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजु आडवे व कैलास ठोंबरे यांनी देखील मोलाची कामगिरी बजावली आहे.
बुलढाणा पोलिसांचा गुजरातमध्ये कारवाईचा डंका वाजला असला तरी, बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे पाहता नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांची इतकी मजल कुठे की, ते पोलिसांच्या आदेशाबाहेर जाऊन काम करतील पण पोलीस दलाला लागलेली हफ्तेखोरीची कीड अवैध धंदे चालकांची मुजोरी वाढवते, असे उघडपणे बोललेल्या जात आहे. शहरात आणि जिल्ह्यात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध वाळू वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड वाहने, अवैध लाकूड वाहतूक, हॉटेल- कॅफे मध्ये चालणारे गैरप्रकार, गुटखा बिनधास्त सुरु आहे. चोरट्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून दुचाकी चोरी तर ठरलेलीच आहे. काल शहरातील डॉ.मंजुश्री खोब्रागडे या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व मंगळसूत्र दुचाकी चोरांनी अवघ्या काही सेकंदात तोडून लंपास केली.