१० एप्रिलला रिपब्लिकन सेनेचा आंदोलनाचा इशारा
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – वरली- मटका, जुगार या अवैध धंद्याचा बाजार एवढा वाढला की, भाजीपाल्याच्या दुकानांची संख्या देखील अवैध धंद्यांच्या दुकानासमोर कमी वाटू लागली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याने बेजार झालेले लोणार सरोवर अलीकडे अवैध धंद्यात प्रसिद्ध होऊ लागले आहे. दरम्यान पोलिसांनी या अवैध धंद्यांचा गाशा गुंडाळावा अन्यथा १० एप्रिलला तहसीलसमोर आंदोलनाचा ढोल ताशा वाजणार, असा इशारा रिपब्लिक सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत लोणार तालुका व शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. तालुका आणि शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात असल्याचा आरोप होतोय.
बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच बुलढाणा जिल्हाभर दारूचा व्यवसाय,सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. वरली-मटका,जुगार अवैध दारू विक्री व्यवसाय पोलिसांनी बंद करावा अन्यथा, १० एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर ढोल ताशा आंदोलन छेडणार असा इशारा तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव सुरेश मोरे, दिलीपराव पंडागळे, आदर्श मोरे, गौतम सदावर्ते, एकनाथ सदावर्ते, स्वप्निल अंभोरे,रवी अंभोरे,अनिल पसरटे, रोशन अंभोरे,प्रज्ञाशील अंभोरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.