बुलढाणा (खास प्रतिनिधी) – मागण्या करूनही शासन-प्रशासन दुर्लक्षित आहे. तरीही विविध मागण्यांकडे यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चेतावणी धरणे आंदोलन’ करण्यात आले. जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी यावेळी ठोक मोर्चाची चेतावणी दिली.
निलेश जाधव यांच्यासह महासचिव विष्णू उबाळे, प्रशांत वाघोदे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘ या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.गरीब मराठा आरक्षण लागू करावे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना, मोहम्मद पैगंबर विल लागू करावे, आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींची जागा नियमाकुल करावी, घरकुलाचा निधी अडीच लाख करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, जिल्हा बँकेची सक्तीची वसुली थांबवून व्याज माफ करावे, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
सदर मागण्या मान्य न झाल्यास ठोक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निलेश जाधव यांनी यावेळी दिला. या आंदोलनात बाळासाहेब वानखेडे, रमेश आंबेकर, अमर इंगळे, शेषराव मोरे, वासुदेव वानखेडे, सुखदेव जाधव, अनिल जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले. महिलांची लक्षणीय उपस्थिती आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.