देशात जुमल्यावाल्यांचे, खोकेवाल्यांचे सरकार, शेतकरी मेला तरी त्यांना काही घेणंदेणं नाही!
– काँग्रेसच्या कृषी अधिकारी कार्यालयाला घेराव आंदोलनाने चिखली दणाणली!
– सरकारविरोधात शेतकर्यांची प्रचंड एकजूट, ट्रॅक्टर, बैलगाडीने मोर्चा कृषी कार्यालयावर धडकला
चिखली (संजय निकाळजे/विनोद खोलगडे) – शेतकर्यांच्या हक्काची पीकविम्याची रक्कम तात्काळ द्या, सोयाबीनला भाववाढ द्या व इतर शेतकर्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांचा ट्रॅक्टर, बैलगाडीद्वारे विराट मोर्चा तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी “राज्य व केंद्रात जुमल्यावाल्यांचे, खोक्यावाल्यांचे सरकार आहे. त्यांना शेतकर्यांशी काहीही देणंघेणं नाही. शेतकरी मेला काय अन जगला काय, त्यांना काहीही सोयरसुतक नाही. देशात हुकूमशाही सुरू असून, लोकशाही फक्त कागदावर उरली आहे. इडी, सीबीआयचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबला जात असून, हे लोन आता दिल्लीतून पार गल्लीत आलं आहे. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी शेतकर्यांसाठी लढतच राहीन’, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, बुलढाण्याचे माजी आमदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धनदादा सपकाळ, आमदार धीरज लिंगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज दांडगे, शिवसेनेचे तालुका प्रमुख किसन धोंडगे, ज्योतीताई खेडेकर, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते यांच्या नेतृत्वात हा शेतकरी मोर्चा चिखली शहरात निघाला. राहुलभाऊंच्या जनसंपर्क कार्यालयापासून निघालेला हा मोर्चा डफड्यांचा दणदणाट, सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी, बैलगाडी व ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा, आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातून आलेले शेतकरी असा तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडकला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल बोंद्रे, हर्षवर्धनदादा सपकाळ, धीरज लिंगाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांची यावेळी घणाघाती भाषणे झाली.
यंदा अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान केले. परंतु, पीकविमा कंपनीने शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली नाही. कापूस, सोयाबीनच्या भावासाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले, तर तुपकर यांच्यासह शेतकर्यांच्या पाठीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या पोलिसांनी वळ उमटविले. हे सरकार व्यापार्यांचे आहे, अदानी-अंबानीचे आहे. या सरकारचे धोरण म्हणजे शेतकर्यांचे मरण आहे, अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घेराव आंदोलनात केली. याप्रसंगी तातडीने पीकविम्याची रक्कम देण्यासह इतर शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी कृषी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या घेराव आंदोलनामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला अक्षरशः छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
दरम्यान, आज चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचा वाढदिवस होता. एकीकडे भाजपकडून आमदारांचा जोरदार वाढदिवस साजरा होत असताना, दुसरीकडे राहुलभाऊ बोंद्रे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकर्यांसह कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत, शहरात विराट मोर्चा काढला. त्यामुळे आमदारांच्या वाढदिवसाऐवजी महाविकास आघाडीच मोर्चाच शहरात जोरदार चर्चेचा मुद्दा ठरला होता.
————————