बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जंगलव्याप्त परिसरात वणवा भडकून निसर्गाची हानी होण्याच्या घटना समोर येतात. बुलढाणा शहराला लागून असलेल्या हनवतखेडच्या जंगलात २६ मार्चला सायंकाळी आग लागली होती. मात्र वनविभागाने तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी दिली. परंतु वन्य जीवांच्या काळजात सध्या तरी, वणवा पेटल्याचे दाहक चित्र आहे. दरम्यान जैवविविधतेने समृद्ध असलेल्या जंगल क्षेत्रातील वणवे रोखण्याची गरज असल्याची भावना वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटना घडत असतात. शहराला लागून अनुवादक कडे दिल जंगल परिसर काल वनवा पेटला होता. परंतु बुलढाणा वन विभागाने सावध भूमिका घेऊन आग विझविली. मात्र या प्रकारात वाढ होत चालल्याने, हे प्रकार टाळण्यासाठी जनजागृतीसह ठोस उपाययोजनांची गरज आहे.रोज कुठे ना कुठे वणवा लागल्याच्या घटना घडतात. वणव्यामुळे अनेक पक्षी, घरटी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव यांची जीवितहानी फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होते. ज्या परिसरामधे वणवा लागतो तेथील जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुर्नस्थापित होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे जंगले विरळ होत आहेत. मानवनिर्मीत वणवे बेकायदा आहेत. नैसर्गिक व अनैसर्गिक वणव्याच्या दाहकतेतून जंगलांना, निसर्गाला वाचवायचे असेल तर सरकारने वणवामुक्त गाव योजना, आमचा गाव वणवामुक्त गाव, ग्रामसभा घेवून वृक्षवल्ली अभियान, वृक्षसंवर्धन मार्गदर्शन, स्थानिक युवकांना वणवा आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देवून वणवाविरोधी सशस्त्र पथक आदी पर्यायाबरोबरच निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी जनजागृती करावी, असे मत पर्यावरणप्रेमी व वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.