– चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडली विदर्भातील सर्वात मोठी टुर्नामेंट!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आमदार चषक अंतिम सामन्याचा थरार उत्तररात्रीपर्यंत रंगला. अखेर अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात शिवराणा चांडोळ संघाने चार चेंडू आणि सहा गडी राखून राम सुरडकर यांच्या साईबाबा संघावर मात केली. विजेच्या ठरलेल्या शिवराणा संघाला तीन लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस देऊन आमदार श्वेताताई महाले पाटील, संदीप शेळके यांच्याहस्ते गौरविण्यात आले. रात्री बाराच्या ठोक्याला सुरू झालेला हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींची गर्दी लोटली होती.
विदर्भातील सर्वात मोठी टुर्नामेंट ठरलेल्या चिखलीतील आमदार चषकासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात संघ सहभागी झाले होते. आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराजदादा पाटील मित्रमंडळाच्यावतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २२ मार्च सुरू झालेल्या या टुर्नामेंटमध्ये राज्यभरातील १६ संघांनी सहभाग घेतला होता. सर्व सामने अत्यंत चुरशीचे खेळले गेलेत. या सर्व संघातून चार संघ उपांत्य फेरीत तर शिवराणा चांडोळ व साईबाबा एलेव्हन हे संघ अंतिम फेरीच पोहोचले होते. अंतिम सामना काल मध्यरात्री बारा वाजेच्या ठोक्याला सुरू झाला. नाणेफेक जिंकून शिवराणा संघाने गोलंदाजी घेतली. साईबाबा संघाने ८ षटकांत ७ गडी गमावून ८६ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना शिवराणा संघाने आपले चार फलंदाज ४० धावांच्या आत गमावले होते. परंतु, सूरज आणि विशाल गुंजाळ यांनी जोरदार फटकेबाजी करून सामना संघाच्या खिशात घातला. या सामन्यात श्याम त्र्यंबके मालिकावीर व उत्कृष्ट गोलंदाज तर विश्वजीत राजपूत याला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
—————–