– दारूविक्री बंद करण्यासाठी गावातील महिलांचे ठाणेदारांना निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा!
बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील चिखला या गावात खुलेआम गावठी व अवैध दारूविक्री सुरू असून, त्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. अनेक तरुण व्यसनी बनत असून, अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत. ही दारूविक्री बंद करण्याबाबत गावातील महिलांनी संबंधित दारूविक्रेत्यास सांगितले असता, तो आम्ही पोलिसांना हप्ते देतो, आमचे हप्ते एसपींपर्यंत जात आहेत, अशी दमदाटी करून दारूविक्री बंद करणार नाही, काय करायचे ते करून घ्या, अशा धमक्या देत आहे. तेव्हा ही दारूविक्री तातडीने बंद करावी, या मागणीचे निवेदन गावातील महिलांनी बिबी पोलिस ठाण्याला दिले आहे. ही दारूविक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.
सविस्तर असे, की लोणार तालुक्यातील बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत चिखला येथे सर्रासपणे अवैध दारूविक्री सुरु असून, दारुविक्री करणारे व्यक्ती हे अवैधरित्या देशी दारु खरेदी करून ती दारु बिनधास्त पणे कोणाचीही भीती न बाळगता चिखला येथे विक्री करत आहे. याचा परिणाम तरुणपिढीवर तसेच गावातील इतर पुरुषांवर होत असून, यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. गावतच दारू मिळत असल्याने गावातील तरुण मोठ्या प्रमाणात खर्च करुन दारुचे सेवन करतात. महिलांना मारहाण करतात, पैसे नसल्यास दारूसाठी घरातील मौल्यवान वस्तु, धान्य, भांडी विक्री करून दारू पितात. त्यामुळे महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सदर दारुविक्री मुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होऊन तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे भविष्यसुध्दा संकटात टाकत आहे. त्यामुळे सदर दारुविक्री करणार्या व्यक्तींना दारु विकण्यास मज्जाव केला असता, त्यांनी महिलांना धमक्या देऊन जे काय करायचे ते करा, मी पोलिसांना हप्ता देतो, हप्ते जिल्हा पोलिस अधिकार्यांपर्यंत आहे. पोलिस आमचे काहीही करू शकत नाही , अशा प्रकारे उलट भाषेत उत्तरे देतात, व सतत दारुविक्री सुरु ठेवतात.
या दारुच्या पायी एखाद्या महिलेने आत्महत्या केल्यास त्यास आपले पोलिस स्टेशन जबाबदार राहील. अवैध देशी दारू विक्री करणार्यांवर तात्काळ कार्यवाही करून देशी दारूविक्री बंद करावी, असे निवेदन सौ. अलका सुरेश पाडमुख यांच्या नेतृत्वात बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख संजीवनी काशिनाथ वाघ, गुंफा काशिनाथ वाघ, जिजा अशोक नागरे, कविता विजय वाघ, दीपाली विकास वाघ, रेखा विठ्ठल वाघ, निर्मला एकनाथ काकड, कावेरा काकड यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.