किनगावजट्टू, ता. लोणार (जयजीत आडे) – बिबी येथून जवळच असलेले किनगावजट्टू, ता. लोणार येथे देवखेड ते किनगावजट्टू शेत रस्त्यालगतच्या हरण टेकडी शिवारातील विहिरीत गावातील एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केली. संजय सखाराम सरकटे (वय ५५) असे या व्यक्तीचे नाव असून, रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झाला होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मृतक हा दररोज दारू पित होता, त्यामुळे त्याने नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काल दिनांक २६ मार्चरोजी दुपारी ११.३० वाजेदरम्यान गावातील काही लोकांना लगतच्या शेताच्या विहिरीत एक प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी लगेच गावातील संबंधितांच्या नातेवाईकांना कळविले. सदर विहिरीवर नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता विहिरीमध्ये संजय सखाराम सरकटे यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. विहिरीच्या पाण्यातील हे प्रेत संजय सखाराम सरकटे यांचे असल्याचे खात्री झाली. त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. तसा तोंडी रिपोर्ट गजानन आबाराव सरकटे यांनी पोलीस स्टेशन बिबी येथे दिला आहे. या तोंडी रिपोर्टवरून रविवारी मर्ग ०३/२३ कलम १७४ जाफौ अन्वये दाखल करून एपीआय सोनकांबळे यांच्या आदेशाने बीट अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल बद्रीनारायण कायंदे, पोलीस कॉन्स्टेबल सांगळे हे पुढील तपास करीत आहेत. संजय सरकटे यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असल्याचे सांगितले जात असले तरी, त्याने आत्महत्या का केली, याबाबत गावात चर्चा सुरू आहे.
दारूच्या नशेत आत्महत्येचा संशय!
या घटनेबाबत गजानन आबाराव सरकटे (वय ५२) यांना गावातील बशीर शहा कादर शहा यांनी घरी जाऊन सांगितले, की हरण टेकडी लगरच्या विहिरीत एक प्रेत दिसत आहे. त्यावरून गजानन सरकटे यांचा मोठा मुलगा संतोष सरकटे व गावातील महादेव आश्रुजी जाधव, नीलेश भगवान महाजन, गजानन वामनराव मुतर्डकर, व इतर लोकं हे विहिरीवर गेले असता, त्यांना गजानन सरकटे यांचा चुलत भाऊ संजय सखाराम सरकटे हे विहिरीत मृत्यू झाल्याचे दिसून आले. मृत संजय सरकटे हे रोज दारू पित होते, तसेच त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. त्यामुळे त्यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
——————-