बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड़णुकीसाठी आज, २७ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये शेतकरीही निवड़णुकीसाठी उभे राहू शकतात, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही.
जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर व नांदुरा या दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवड़णूक होत असून, आज (दि.२७)पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यात ११ सदस्य विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून, ४ सदस्य ग्रामपंचायत मतदारसंघातून, दोन सदस्य व्यापारी व एक सदस्य हमाल मापारी मतदारसंघातून निवड़ून द्यायचे आहेत. यासाठी शेतकरीही सोसायटी किंवा ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही.
मतदानाचा अधिकार फक्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांनाच आहे. जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात म्हणजे २८ व ३० एप्रिलला मतदान होणार असल्याची माहिती ब्रेकिंग महाराष्ट्रच्या हाती आली असून, याबाबतची अधिकृत घोषणा आज होऊ शकते. ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम असल्याने सर्वच राजकीय पक्ष सर्व तयारीनिशी मैदान गाजवणार आहेत. ही काहीशी सुरूवात असून, पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.