– पीकविम्याच्या पैशासाठी चकरा मारून शेतकरी वैतागले! सोयाबीन झाली बेभाव!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पीकविम्याचे पैसे त्वरित द्यावेत, तसेच सोयाबीनला योग्य भाव द्यावा व इतर मागणीसाठी सोमवार, दि. २७ मार्च रोजी चिखली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला महाविकास आघाड़ीच्यावतीने घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच खामगाव येथे २८ मार्च रोजी माजी आ.सानंदा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढला जाणार आहे.
पीकविम्याचे पैसे आज भेटतील, उद्या भेटतील या भाबड्या आशेने शेतकरी कृषी विभागात चकरा मारून वैतागला आहे, पण काहीच फायदा झाला नाही. तर सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक विम्याचे पैसे त्वरीत द्यावेत, सोयाबीनला योग्य भाव दयावा व इतर मागण्यासाठी महाविकास आघाड़ीच्यावतीने चिखली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत घेराव घालण्यात येणार आहे. तरी कार्यकर्ते, शेतकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चिखली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक म्हस्के, शिवसेना (ठाकरे) तालुका प्रमुख श्रीकिसन धोंड़गे यांनी केले आहे.
पिक विम्याचे पैसे त्वरित द्यावेत, सोयाबीनला योग्य भाव दयाव, खामगाव मतदारसंघात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरसकट मदत द्यावी, यासह इतर शेतकरी मागण्यांसाठी खामगावात २८ मार्च रोजी माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांचे नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
——————–