Breaking newsHead linesKhandeshMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही, उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या विराट सभेतून विरोधकांना ठणकावले!

– उद्धव ठाकरे यांची मालेगावात अतिविराट जाहीर सभा

मालेगाव (प्रतिनिधी) – ‘विनायक दामोदर सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत, त्यांचा अपमान करू नका,’ असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला. काल राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना इशारावजा सल्ला दिला. तसेच, गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही, असेही ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला ठणकावले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवले. यावर शनिवारी (२५ मार्च) राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी केली होती. यावरून आज (२६ मार्च) शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावरती भाजपाकडे उत्तर नाही आहे. हिंडेनबर्ग हजारो कोटी रूपयांचे घोटाळे काढत आहे. पण, भाजपा त्याला किंमतही देत नाही. पंतप्रधान उत्तरही देत नाही. आमच्याकडे साध्या-साध्या लोकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावून घोटाळे काढण्यात येत आहेत. ’’आपलं नाव चोरलेलं आहे, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काहीही नाही, तरीही इतकी मोठी गर्दी माझ्यासमोर उभी आहे. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे.’ ‘मी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. मी तुमच्या प्रश्नांसाठी लढायला उभा आहे. आता जिंकेपर्यंत लढायचं, असं एकच ब्रिदवाक्य आमचं आहे. गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही. ”मुख्यमंत्रिपद येतं आणि जातं. पण तुम्ही मला तुमच्या कुटुंबातील एक मानलात. असं प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही. तुम्ही हे प्रेम चोरू शकणार नाही,’ असेही ठाकरे म्हणाले.


उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटातील नेत्यांसह भाजपवर यांच्यावर निशाणा साधला. गद्दारांना शिवधनुष्य पेलवणार नाही, ते धनुष्यबाण घेऊन रावणासारखे खाली कोसळतील. आज ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, यावरून एकत्र येऊन लढणं गरजेचे आहे, राज्यातील जनतेवर सर्वकाही अवलंबून आहे. आगामी निवडणुकांमध्ये जर पुन्हा यांनाच बसवले तर नक्कीच देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!