समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ एसटीबसला टिप्परने ठोकले, १७ प्रवासी जखमी
– जखमी प्रवाशांवर मेहकरमध्ये उपचार सुरू, बसचे मोठे नुकसान
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ एसटी बस व वाळू वाहतूक करणार्या टिप्परचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले आहेत. महामार्गाच्या पुलाजवळ सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्देवी घटना घडली. अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून, चालकाच्या प्रसंगावधनाने मोठी जीवितहानी टळली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी प्रवाशांना मेहकर येथे हलविले होते.
शेगावहून मेहकरकडे येणार्या शेगाव-मेहकर बसला भरधाव जाणार्या व वाळू वाहतूक करणार्या टिप्परने जोरदार धडक दिली. मेहकर जवळील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना मेहकर येथे हलविण्यात आले होते. मेहकरच्या दिशेने येणार्या बसला या पुलावर टिप्परने अचानक टर्न घेतल्याने समोरासमोर धडक बसली. अपघातानंतर टिप्परचालक टिप्पर भरधाव दामटत घटनास्थळावरून पळून गेला. मेहकर पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे, समृद्धी महामार्ग हा विदर्भाची मृत्यूरेषा बनला असून, सर्वाधिक अपघात हे मेहकर तालुक्यातच होत आहेत. आतापर्यंत ४१ अपघात हे या मार्गावर बुलढाणा जिल्ह्यात झालेले आहेत. दरम्यान, समाेरून आलेल्या टिप्परला बसने धडक दिल्याचे काहीजण सांगत आहेत. मेहकर पाेलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
———–