– बिबी पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल, रुम्हणा, शेवली येथील आरोपी जेरबंद
लोणार/ बिबी (ऋणी दंदाले) – मोबाईलवरील मेसेजच्या कारणावरून रूम्हणा, ता. सिंदखेडराजा व शेवळी (ता. मंठा) येथून दुचाकीवर आलेल्या स्त्री व पुरुष आरोपींनी २८ वर्षीय युवकास भुमराळा दरी (ता. लोणार ) येथे येवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. पुतण्याला का मारता म्हणून विचारण्यास गेलेले व भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणारे या युवकाचे काका भानुदास रोहिदास चव्हाण (वय ५०) रा. भुमराळा दरी यांनाच संबंधित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी छातीवर अमानुष मारहाण करत, तसेच हाताने गळा आवळून निर्घृण हत्या केली. तोंडातून उलट्या होईपर्यंत ही मारहाण सुरू होती. शेवटी बेशुद्ध पडल्यानंतर तेथील काही जणांनी चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील असलेल्या एकूण पाच आरोपींविरोधात खुनाचा तसेच इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, बिबी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
सविस्तर असे, की लोणार तालुक्यातील भुमराळा दरी येथील मृतक भानुदास रोहिदास चव्हाण (वय ५०) हे शेतकरी असून, शेती करून आपली उपजीविका चालवितात. या खुनाच्या घटनेबाबत आज (दि.२३) दुपारी एक वाजता प्रयागबाई भानुदास चव्हाण (वय ४०), रा. भुमराळा दरी यांनी बिबी पोलीस स्टेशनला दिरासोबत येऊन तोंडी फिर्याद दिली की, मी व माझे पती भानुदास चव्हाण राहणार भुमराळा दरी, तालुका लोणार येथे शेती करतो व आमचा उदरनिर्वाह करतो. मी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास आमच्या घरी आम्ही असताना आरोपी नितीन अशोक कहाळे, सीमा नितीन कहाळे हे दोघेही रा. रुम्हणा, तालुका सिंदखेडराजा व आरोपी दिलीप यशवंत काळे, मंगल दिलीप काळे, भरत दिलीप काळे हे राहणार शेवळी, तालुका मंठा, जिल्हा जालना हे सर्वजण मोटारसायकलवरून माझा चुलत दीर गणेश चिंतामण चव्हाण (वय २३) रा. भुमराळा दरी यांच्या घरी आले होते. त्यांनी आल्याआल्याच माझे चुलत दीर गणेश यास थापड व बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडण चालू असल्यामुळे भांडण सोडविण्यासाठी माझे पती नामे भानुदास चव्हाण हे गेले असता, त्यांनी पोरांना मारू नका, असे म्हणाले असता, नितीन अशोक कहाळे, सीमा नितीन कहाळे, भरत दिलीप काळे, दिलीप यशवंत काळे, मंगला दिलीप काळे यांनी भानुदास रोहिदास चव्हाण यांच्या छातीमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे भानुदास चव्हाण हे खाली पडले व त्यानंतर पुन्हा सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व भारत दिलीप काळे यांनी भानुदास चव्हाण यांचा गळा दाबला, व त्यावेळी त्यांच्या तोंडातून नाकातून जेवणाच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने गणेश चिंतामण चव्हाण, सुभाष रामभाऊ चव्हाण यांनी बिबी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या तक्रारीवरून संबंधित सर्व आरोपींवर भादविंच्या ३०२, ३२३, १४३, १४७, १४९ कलमांसह गैरकायद्याची मंडळी जमवून भांडण करणे असे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तरी पुढील तपास एसडीपीओ सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे साहेब हे करीत आहेत. या घटनेने भुमराळा दरीसह परिसरात एकच खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त होत आहे.
——————