बुलढाणा (खास प्रतिनिधी) – कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत कृषी धोरणाचे दोन वर्ष निघून गेले. परंतु महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्ग व्याज, विलंब आकारात माफी, सुधारीत थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे नऊ दिवसच उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी धोरणात सहभागी होऊन ३० टक्के सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्यावतीने कृषी अभियानाअंतर्गत कृषी धोरण २०२० राबविण्यात येत आहे. तीन वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्षही येत्या ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलतही ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणार्या शेतकर्यांना व्याज व विलंब आकारत माफी, तर सुधारीत थकबाकीतही ३० टक्के सुट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना महावितरणच्या कृषी धोरणाबाबत माहिती देऊन सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धोरण पोहोचले आहे, परंतु ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे दोन वर्ष निघून गेले असून, आता फक्त दुसर््या वर्षाचे ०९ दिवस उरले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी १ हजार ५६४ कोटीच्या घरात होती. धोरणानुसार दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून ६१४ कोटी माफ होणार आहेत. त्यामुळे सुधारित थकबाकीच्या ९५० कोटीच्या थकबाकीतही ३० टक्के थकबाकी माफ होत असल्याने, शेतकर्यांना ७० टक्के हिश्श्यापोटी सुधारीत थकबाकीच्या केवळ ६६५ कोटी आणि सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरायचे आहेत.
योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ६५ हजार ४०४ थकबाकीदार कृषीपंपापैकी ६३ हजार ७३ शेतकर्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ १ हजार ९४८ शेतकर्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे. तर उर्वरित शेतकर्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात आहे.