Breaking newsBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

बुलढाण्यातून लोकसभेसाठी रविकांत तुपकर!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले असतानाच, बुलढाण्यात शेतकरी नेते तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीदेखील आपण लोकसभा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तुपकरांचे शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांशी असलेले संबंध पाहाता, महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार देणार की, तुपकरांना पाठिंबा देणार? दुसरीकडे, बुलढाण्याची जागा भाजप पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आपला उमेदवार देणार की, शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा संधी मिळणार? याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे जिल्हाभर जोरदार केडरबेस कार्यकर्ते तर आहेच, पण त्यांनी शेतकरीप्रश्नी केलेले आंदोलने पाहाता त्यांना भावी खासदार म्हणूनच जिल्ह्यात पाहिले जात आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी व प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश याबाबी जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेला फारशा आवडलेल्या नाहीत. कट्टर शिवसैनिक तर शिंदे गटाच्या विरोधात आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाने बुलढाण्याच्या जागेवर लक्ष केंद्रीत केलेले असून, त्यामुळे ही जागा भाजपला हवी आहे. तसे झाले तर भाजपसोबत असलेल्या शिंदे गटाच्या प्रतापरावांसमोर मोठीच राजकीय अडचण निर्माण होणार असून, वेळप्रसंगी त्यांना धनुष्यबाण किंवा कमळ यापैकी कोणतेही चिन्ह हातात घेण्याची वेळ येऊ शकते. दुसरीकडे, बुलढाण्याची जागा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. परंतु, दोनवेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे हे स्वतः लोकसभेच्या मैदानात पराभूत झालेले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेना किंवा काँग्रेस मागू शकते. तसे झाले तर काँग्रेसकडे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे तगडे उमेदवार आहेत. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे इच्छुक आहेत.

महाविकास आघाडी एकत्र लढली तर ही जागा निश्चितपणे महाविकास आघाडीला मिळू शकते. परंतु, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभा लढविणार असल्याने महाविकास आघाडी, तुपकर आणि भाजप किंवा शिंदे गट या तिहेरी लढाईत प्रतापराव जाधव हे हॅटट्रीक साधू शकतात. त्यामुळे रविकांत तुपकर व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी एकत्रित लढण्याची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेतलेली आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीत पुन्हा येणे अशक्य आहे. तसेच, बुलढाणा किंवा विदर्भ, मराठवाड्यात रविकांत तुपकर यांच्यामुळेच या संघटनेचे अस्तित्व आहे. तसेही तुपकर यांची शेट्टी यांची काही बाबतीत राजकीय नाराजी आहे. ही बाब पाहता, तुपकर हे लोकसभेसाठी महाविकास आघाडीशी स्वतंत्रपणे राजकीय घरोबाही करू शकतात, किंवा वेळप्रसंगी शरद पवारांसोबतही जाऊ शकतात, अशी एक दाट राजकीय शक्यता आहे. तसे झाले तर दुहेरी लढतीत रविकांत तुपकर हे बुलढाण्यातून नवी दिल्लीत पोहोचू शकतात. शेतकर्‍यांचा आक्रमक व अभ्यासू आवाज लोकसभेत पोहोचला तर त्याचा निश्चितच शेतकरीवर्गाला फायदा होणार आहे.

गुढीपाडव्याचा मुहूर्तावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या राजकीय घोषणेनुसार, ते हातकणंगलेसह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याचे म्हणालेत. त्यानंतर लगेचच बुलढाण्यातून आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करताना, राज्यातील हातकणंगले, सांगली व कोल्हापूरसह पाच लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले असले तरी, त्यांनी इतर दोन कुठले जिल्हे किंवा मतदारसंघ आहेत? याचा मात्र उल्लेख केला नाही. किंवा, बुलढाण्याबाबत कोणतीच घोषणा केली नाही. यावरून रविकांत तुपकर यांच्याबाबत शेट्टी यांच्या मनात नेमके काय आहे, हे कळायला मार्ग नाही. तरीही, पक्षाने काहीही भूमिका घेतली तरी लोकसभा निवडणूक लढवूच, ही ठाम भूमिका घेऊन रविकांत तुपकरांनी राजू शेट्टी यांच्यावरदेखील राजकीय दबाव निर्माण केलेला आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!