गारपिटीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी!
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करुन शेतकर्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, तसेच खरीप हंगामातील शासनाने मंजूर केलेले नुकसान भरपाईचे १७४ कोटी देखील शेतकर्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत निसर्गाच्या अवकृपेने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमुद आहे की, जिल्ह्यात १६ मार्चपासून वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा यासह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २० मार्चपर्यंत जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील शेतीपिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. याआधी खरीब हंगामात देखील अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी १७४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली. परंतु अद्यापही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. सोयाबीन-कापसाला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने अनेक शेतकर्यांचा माल घरातच पडून आहे, त्यामुळे रब्बीच्या उत्पादनावर शेतकर्यांची आशा होती. त्यातच गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आधार देणे आवश्यक आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शेतकर्यांना शंभरटक्के नुकसान भरपाई तात्काळ द्यावी तसेच आधीचे मंजूर असलेले १७४ कोटी रुपये शेतकर्यांना अदा करावे, अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.