BULDHANAHead linesVidharbha

अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पीक मातीमोल; पालकमंत्री आहेत कुठे? जिल्हाभरात पंचनामेही गोगलगायीच्या गतीने!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात गारांसह जोरदार अवकाळी पाऊस पड़ला. यामुळे हातातोंड़ाशी आलेला घास हिसकावला गेला असून, हजारो हेक्टरवरील पिके नेस्तनाभूत झाली आहेत. ऐवढी गंभीर परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढावली असताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बुलढाण्याकडे फिरकले देखील नाहीत. ते आहेत तरी कुठे? असा संतप्त सवाल यानिमित्ताने विचारला जात असून, शेतकरीवर्ग तीव्र भावना व्यक्त करत आहेत. जिल्हा प्रशासनाचे पंचनामे गोगलगायीच्या गतीने होत असून, पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन पाहणी करणे तर दूरच, साधा आढावादेखील घेतला नाही तसेच मदतीबाबत अवाक्षरही बोलले नाहीत, यावरून शेतकरी संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात चारवेळा अवकाळी पाऊस पड़ला. १७ मार्चपासून तर दररोज जिल्ह्यात विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा संग्रामपूर, नांदुरा तालुक्यांसह सर्वदूर जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. चिखली तालुक्यातील मिसाळवाड़ी, अंढेरा, पिंपळवाडी, अंचरवाडी, शेळगाव आटोळ, भरोसा, मेरा तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरालाही गारांनी झोड़पले. यामध्ये मोठे नुकसान झाले. संबंधित तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले, पंचनामे सुरूही झाले पण कर्मचारी संपावर होते. त्यामुळे पंचनाम्यांना पाहिजे तसा वेग मात्र दिसत नव्हता. अजूनही दहा ते बारा टक्केच पंचनामे झाल्याची माहिती आहे.

मलकापूर व खामगाव तालुक्यांत तर तुफान गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बीचे पीक जसे गहू, हरभरा, मका, ज्वारी, आंबा, लिंबू, तसेच फळबागा असे जवळपास अडिच हजारांवर हेक्टरचे नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील माटरगाव, आंबेटाकळी, बोरीअड़गाव, अटाळी, विहिगावसह विविध भागात सलग तीन दिवस वादळासह पाऊस व गारपीट झाली. यामुळे पाटाच्या पाण्यावरील पिके तर पूर्णतः हातून गेली. जिल्ह्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना ज्यांच्यावर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आहे असे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत तरी कुठे, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. तसेच संतापही व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री या नात्याने गुलाबराव पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत संबंधितांना आदेशित करावे, अशी रास्त मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!