BULDHANAHead linesVidharbha

विश्वास काटकर समजून मेहकरच्या ग्रामविकास अधिकार्‍यांनाच दिवसभर शिव्या घालणे सुरू!

– कुणी तरी खोडसाळपणा केला, माझा नंबर व्हायरल केला – तांबारे यांची संतप्त प्रतिक्रिया
– ९८५०५८७००२ हा मोबाईल क्रमांक विश्वास काटकर यांचा नाही!

मेहकर (अनिल मंजुळकर) – अतिशय निर्णायक टप्प्यात आलेला जुन्या पेन्शनचा लढा यशस्वी होण्याची पूर्ण खात्री असताना, राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी राज्य सरकारसमोर नांगी टाकून, जुन्या पेन्शनबाबत सरकारचे कोणतेही ठोस आश्वासन नसतानादेखील संप मागे घेतला व राज्यातील १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांच्या आशेवर पाणी फेरले. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, काटकर यांचा नंबर समजून कुणी तरी मेहकरचे ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांचाच मोबाईल नंबर व्हायरल केला आणि राज्यभरातून काटकर समजून संतप्त कर्मचारी तांभारे यांनाच फोन लावून शिव्या घालण्यास सुरूवात झाली. हा काटकर यांचा नंबर नाही, हे तांबारे सांगत आहेत, तरी कर्मचारी ऐकत नाहीत. किती खोके घेतले, अशा प्रकारचे प्रश्न विचारून व धमक्या देऊन आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत आहेत. या सर्वप्रकारामुळे ग्रामविकास अधिकारी तांबारे हे चांगलेच वैतागले असून, हा कुणी तरी खोडसाळपणा केल्याचा आरोप त्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना केला आहे. दरम्यान, व्हायरल झालेला ९८५०५८७००२ हा मोबाईल क्रमांक विश्वास काटकर यांचा नसून, दीपक तांबारे यांचा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर जुनी पेन्शनच्या संदर्भात संप सुरू होता. ‘एकच मिशन… जुनी पेन्शन ‘ असा नारा देत महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांमधील कर्मचार्‍यांनी या संपामध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी हे सुकाणू समितीचे मुख्य समन्वयक विश्वास काटकर यांच्या नेतृत्वात बैठकीत सहभागी झाले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही प्रमुख मागणी असताना ही मागणी सरकारने मान्य न करताही सुकाणू समितीने संप मागे घेतला. विश्वास काटकर यांनी तशी घोषणा केली. युद्धात जिंकले पण तहात हरल्यामुळे संपकरी कर्मचारी तीव्र संतप्त झालेत. त्यातच विश्वास काटकर यांचा नंबर समजून कुणी तरी मेहकर पंचायत समितीतील ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांचा मोबाईल क्रमांक चोहीकडे व्हायरल केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना काटकर समजून हजारो फोन आले. फोन करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना ‘तो मी नव्हे…!’ अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. हे कर्मचारी काटकर समजून तांबारे यांना किती खोके घेतले, तसेच अर्वाच्च भाषेत बोलत होते. शेवटी फोनमुळे त्रस्त झालेल्या ग्रामविकास अधिकारी तांभारे यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जुनी पेन्शनची मागणी करणार्‍या कर्मचार्‍यांसोबत संवाद साधून त्यांना विनंती केली की, हा माझा नंबर आहे. यावर कृपया कुणी फोन करू नये. ग्रामविकास अधिकारी तांभारे हे जुन्या पेन्शनच्या संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी आहेत. हजारो फोन कॉलमुळे ते चांगलेच त्रस्त झाले होते.


काल शासकीय कर्मचारी यांनी पुकारलेला संप माघार घेतल्यामुळे राज्य ग्रूपवर दीपक तांबारे यांचा नंबर ९८५०५८७००२ हा विश्वास काटकर यांचा नंबर म्हणून कुणी तरी व्हायरल केला. वास्तविक पाहाता, हा नंबर काटकर यांचा नसून, वैयक्तिक तांबारे यांचा आहे. तर विश्वास काटकर यांचा नंबर ९८२१००४२३३ असा आहे. परंतु, चुकीचा नंबर व्हायरल झाल्यामुळे विश्वास काटकर समजून राज्य सरकारी कर्मचारी हे दीपक तांबारे यांनाच फोन करत आहेत. तुम्ही काही घेतलं का, माघार कशी काय घेतली, आमचा विश्वासघात केला, आपल्या विश्वास या नावाप्रमाणे वागले नाही, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा संतप्त प्रतिक्रिया दीपक तांबारे यांना आज दिवसभर ऐकाव्या लागल्या आहेत. तरी माझ्या ९८५०५८७००२ या खासगी नंबरवर कोणीही फोन करू नये, व संपाबाबत विचारणा करू नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी दीपक तांबारे यांनी केले आहे.
———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!