Breaking newsBULDHANAVidharbha

संपकरी कर्मचारी कामावर हजर; आठव्या दिवशी शासकीय कामकाज सुरूळीत!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, जिल्हा परिषदेसह इतर विभागाचे कर्मचारी आजअखेर आठव्या दिवशी कामावर हजर झाले असून, त्यांच्या मनात राज्य सरकारने फसविल्याची व राज्य मध्यवर्ती समन्वय समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांच्याविषयी गद्दारीची संतप्त भावना होती. जुन्या पेन्शनबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना, संप मागे घेण्यात आल्याबद्दल या कर्मचार्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील किशोर हटकर यांच्या नेतृत्वात सुमारे ३० हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले होते. परंतु, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारने अवाक्षरही न काढता, हा संप मागे घेण्याची घोषणा राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे कर्मचारी संघटनांचे नेते खोके घेऊन मिंधे झाले असले तरी, आम्ही या सरकारला पुढील निवडणुकीत उत्तर देऊ, असा संताप सरकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यातील बहुतांश सर्व कर्मचारी कामावर हजर झाले असून, जिल्हाधिकारी, तहसील, जिल्हा परिषद, आरोग्य विभागासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील कामावर रूजू झाल्याने, संप मिटला असल्याचे दिसून आले आहे.


लातुरात निघाली विश्वास काटकर यांची अंत्ययात्रा

राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रमुख समन्वयक विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचार्‍यांसी गद्दारी केल्याची संतप्त भावना राज्यभरातील सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांमध्ये आहे. काटकर यांनी किती खोके घेतले, असे संतप्त सवाल कर्मचारी उपस्थित करत असून, सात दिवसांचा संप केवळ काटकर यांच्या गद्दारीमुळे फसल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. लातुरात तर संतप्त सरकारी कर्मचार्‍यांनी विश्वास काटकर यांची प्रेतयात्रा काढून आपला संताप व्यक्त केला. या शिवाय, गोंदिया, अमरावतीसह काही जिल्ह्यातील कर्मचारी आज आठव्या दिवशीदेखील संपात सहभागी असल्याचे दिसून आले.


विश्वास काटकरांच्या प्रतिमेला बुलढाण्यात जोडे हाणले

आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य मध्यवर्ती संघटनेचे राज्य पदाधिकारी विश्वास काटकर यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं आहे. त्यामुळे सरकार हा संप फोडण्यात यशस्वी झाले असले तरी मात्र दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये या संप मागे घेतल्यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!