मेरा बुद्रूक (कैलास आंधळे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात दरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापनेनिमित्त व शेतकरी संवाद सभा व नागरी सत्कार दिनांक १९ मार्चरोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आंदोलन सम्राट रविकांत तुपकर होते, प्रमुख उपस्थितीत वाशिमचे माजी जिल्हा परिषद सदस्य दामुअण्णा इंगोले, विनायक सरनाईक, सहदेव लाड व अनेक मान्यवर उपस्थित होते.
रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणात, दरेगाव हे चळवळीचे जुने गाव असून, आता वेळ बदलली आहे. गावगाड्यातील शेतकर्यांची मुलं ग्रामपंचायत व गावातील पारावरील वट्यावर घाम येईपर्यंत गप्पा मारत बसतात. शेतकरी संघटना पक्ष नसून एक चळवळ आहे, शेतकरी चळवळीत शेतकर्यांनी काम करण्याची गरज आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींना शेतकरी चळवळ उभी करायची नव्हे तर कोलमडून टाकण्याच्या डाव हाती घेला असून, आत्ता शेतकर्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. माझा जीव शेतकर्यांच्या हितासाठी गेला तरी चालेल पण मी मागे हटणार नाही, बुलढाणा येथील आत्मदहन आंदोलनात लाखोच्यावर शेतकरी असते तर लाठीचार्ज झाला नसता. बुलढाणा येथील आत्मदहन आंदोलनात सत्ताधारी पक्षाच्या पुढार्यांच्या इशार्यावरूनच पोलीसाकडून लाठीचार्ज झाल्याचे यावेळी त्यांनी आरोप केला. मी शेतकर्यांसाठी लढलो नसतो तर आमदार, खासदार झालो असतो. सध्या चालू असलेल्या जुनी पेन्शनसाठी सर्व कर्मचारी एकत्र आले तसे शेती प्रश्नावर शेतकर्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. येणार्या काळात पांढर्या कपड्यातील दरोडेखोरांच्या खुर्च्या खाली करण्याचे काम बळीराजाला करायचे आहे. पन्नास खोके एकदम ओके, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.
दामुअण्णा इंगोले यांनी शेतकर्यांच्यावतीने लोकसभा मिशन प्रवासाला दरेगाव येथून सुरवात केली. विनायक सरनाईक, सहदेव लाड, कृषी योध्दा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात व अनेक मान्यवरांचे भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दरेगाव शाखा अध्यक्ष आत्माराम बंगाळे, उपाध्यक्ष मदन बंगाळे, समाधान गाडे, प्रल्हाद काळुसे, संतोष साबळे, राजु पठाण, जगन साबळे व इतरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखा प्रवक्ते शेरखाँ पठाण यांनी केले.