नंदुरबार (जगदीश सोनवणे) रुग्णालयाच्या आवारात तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णांसोबत रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून तंबाखू, गुटखा सेवन करून रुग्णालयात आल्यास व रुग्णालयाच्या आत जाताना सोबत घेऊन गेल्यास पाचशे रुपये दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दिवसभरात तीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात. या व्यतिरिक्त कुपोषित बालके, सिकलसेल रूग्ण, प्रसूती माता, तसेच विविध आजारांसह गंभीर अपघाताच्या रुग्णांना उपचार होईपर्यंत रूग्णालयात थांबावे लागते. दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक ही मोठ्या प्रमाणात रुग्णालयात येत असतात. रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यापैकी काही जण तंबाखू, गुटखा खाऊन रुग्णालयाच्या आवारात तसेच खिडक्या-दरवाजे व खाटेखाली थुंकून घाण करत असल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णालय प्रशासनाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
गेटवरच कसून तपासणी
जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षारक्षकांनी रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची कसून तपासणी करत कारवाईला सुरूवात केली आहे. रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात तंबाखू विमल गुटखा खाऊन थुंकू नये दुर्गंधी पसरवू नये असे आवाहान रुग्णालय प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे