बुलढाणा (संजय निकाळजे) – राज्य शासनाने ‘लेक लाडकी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला असून, तो निर्णय मुलींसाठी फायदेशीर ठरणार आहे. मुलीला जन्मल्यानंतर ५ हजार रुपये तर अठरा वर्षानंतर ७५ हजार रुपये मिळणार आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना जाहीर केली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबीयातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. त्यामध्ये लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्ष्यवेधी ठरली. राज्य शासनाचा या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केसरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. राज्यातील गरीब मुलींना शिक्षणासाठी नवी योजना सरकारने जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना जन्मानंतर तिच्या नावावर ५ हजार रुपये जमा होतील तर ४ हजार चौथी वर्गात असताना, सहाव्या वर्गात ६ हजार रुपये आणि मुलीने अकरावी पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात ८ हजार रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये देण्यात येतील. लेक लाडकी योजनेतून मुलीला एकूण ९८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुलींना सक्षम बनविणारी योजना – प्रियंका आराख
सरकारने सुरू केलेली लेक लाडकी योजना मुलींसाठी लाभदायक असून, मुलींना सक्षम बनवणारी आहे. त्यामुळे स्वागतच आहे. या योजनेमुळे मुलींना आपली प्रगती करता येईल, आणि वाढत्या महागाईच्या युगात पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक वंचित, उपेक्षित कुटुंबातील मुलींना याचा निश्चितच फायदा होईल व शैक्षणिकदृष्ट्या हातभारदेखील लागेल.
– प्रियंका आराख, गांगलगाव, ता. चिखली, जि.बुलढाणा.
———————