– सिंदखेडराजातील दुचाकी रॅलीत तब्बल हजार कर्मचारी सहभागी
सिंदखेडराजा/चिखली (सचिन खंडारे) – राज्य सरकारने विनाविलंब जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले असून, दररोज विविध आंदोलने सुरू आहेत. आज या कर्मचार्यांनी सिंदखेडराजात दुचाकी रॅली काढून सरकारच्या उरात धडकी भरवली. तब्बल एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. तर चिखलीतही सर्व कर्मचार्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात महसूल, शिक्षणसह सर्व विभागाचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने सहभागी झाले होते. कर्मचार्यांच्या एकतेची जोरदार ताकद यानिमित्ताने दिसून आली.
बेमुदत संपाचा चौथ्या दिवशी म्हणजेच दिनांक १७ मार्चरोजी सिंदखेडराजा येथे कर्मचार्यांनी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ही जिजाऊ सृष्टी येथे जाऊन राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहेब यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन पोहोचली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, सर्व शिक्षक कर्मचारी, आरोग्य विभाग, ग्रामसेवक आदी सर्व विभागांचे अंदाजे एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झालेले होते. रॅलीमध्ये महिला कर्मचार्यांचासुद्धा उत्स्फुर्त सहभाग होता.
दरम्यान, चिखलीमध्येदेखील तहसील कार्यालयावर कर्मचार्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनातही हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. महिला कर्मचार्यांचा लाक्षणिय सहभाग होता. जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. महसूल, आरोग्य, पाणी पुरवठा, कोषागार, पंचायत समिती, शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामसेवक आदी सर्व विभागाचे कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व मार्गदर्शन खेडेकर यांनी तर उपस्थितांचे आभार डोंगरदिवे, भंडारे यांनी मानले.
————–