जन्मताच आई गेल्याने चिमुरडी झाली पोरकी!
अकोट/अकोला (लखन इंगळे) – अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात आज एका महिला रुग्णाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोदावरी नंदकिशोर खिल्लारे असे या मृत महिलेचे नाव असून, वाशिम येथील पंचशीलनगरची रहिवासी आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोदावरीचा मृतदेह आज सकाळी वार्ड क्रमांक तेवीसच्या शौचालयात दिसून आला. मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप होतो आहे.
आज सकाळी वार्ड क्रमांक २३ च्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने ही बाब उघडकीस आली. कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने तीन दिवसांपासून शौचालयात असलेला तिचा मृतदेह कुणाच्याच लक्षात आला नव्हता. या महिलेने ३ मार्चला एका मुलीला जन्म दिला. मुलीवर जन्मानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीच्या जन्मानंतर तिची सासरच्या मंडळीकडून छळवणूक सुरू असल्याने ती दिवसांपासून गायब होती. लग्नानंतर तब्बल पाच वर्षांनी गोदावरी पहिल्यांदाच गर्भार राहिली. मात्र, घरी सासू आणि पतीचा मुलगा झाला पाहिजे, यासाठीच हट्टहास होता. ३ मार्चला तिने अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.
दिनांक ६ मार्चला तिला रूग्णालयात भेटायला आलेल्या तिच्या पतीने तिच्यासोबत मुलगी झाल्यामुळे वाद घातल्याची माहिती आहे. यानंतर सासू आणि पतीच्या मानसिक छळामूळे ती तीन दिवसांपूर्वी अचानक गायब झाली. पोलिसांमध्ये ती हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली. आज वार्ड क्रमांक २३ च्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने दार तोडण्यात आले, तेंव्हा गोदावरीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. त्यानंतर रूग्णालयात एकच खळबळ उडाली. गोदावरीने तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी सांगितले.
——————