महिलांनो, अर्ध्या भाड्यात एसटीनेच करा प्रवास!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात येत असून, आज १७ मार्चपासून महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यास सुरूवात झाली आहे. तसे, आदेश राज्य परिवहन महामंडळाने काढले आहेत.
गेले दोन वर्षे कोरोनाचे संकट होते. त्यामुळे एस.टी. वाहतूक बंद होती. त्यामुळे पहिलेच आर्थिक ड़बघाईस आलेल्या महामंड़ळाचा कारभार पूर्णतः ठप्प झाला होता तर अवैध प्रवासी वाहतुकीचा सामना एस .टी. महामंडळ या अगोरपासून करते आहे. एकंदरीत विविध कारणावरून महामंडळाचा तोटा वाढतच असल्याचे सांगण्यात येते. प्रवाशांना ए.टी महामंडळाकड़े आकर्षित करण्यासाठी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अतिस्विकृती धारक पत्रकार, अपंगांसह इतरांनाही विविध सवलती एस. टी. प्रवासासाठी देण्यात येतात. यात आता आणखी एक भर पड़ली असून, शासनाने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला सन्मान योजनेतून एस. टी. प्रवास भाड्यामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज १७ मार्चपासून सुरू झाली आहे. सदर सवलत महामंडळाच्या साधी, निमआराम, शिवशाही, वातानुकूलित, शयन आसनीसह नव्याने दाखल होणार्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये लागू असणार आहे. मात्र आगाऊ आरक्षण तिकीट घेतलेल्यांना यांचा फायदा मिळणार नाही.
या योजनेत जे प्रवासी संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील त्याचेकड़ून आरक्षण आकार घेण्यात येणार आहे, तसेच प्रवास भाड्यात अपघात सहाय्यता निधी व वातानुकूलित सेवा करीता वस्तू व सेवा कराची आकारणी करण्यात येणार आहे. या प्रवास भाड़े सवलतीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाकड़ून करण्यात आले आहे. एकंदरीत शासन ए.टी.चे उत्पन्न वाढण्यासाठी विविध सवलती देवून प्रवासी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून, याचा महमंड़ळाला किती फायदा होईल, हे भविष्यात समजेल.
– सर्व प्रकारच्या गाडीत सवलत
महिलांना बस प्रवास भाड्यात सर्व प्रकारच्या म्हणजे साधी, मिनी, निमआराम, विनावातानुकूलीत, शयन-आसनी, शिवशाही आसनी, शिवनेरी, शिवाई वातानुकूलित यासह भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नवीन येणार्या गाड्यांमध्ये ५० टक्के सवलत राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
– तिकीट रहाणार वेगळं!
‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. महिलांसाठी अर्धे तिकीट असल्याने यासाठी नवीन वेगळं तिकीट रहाणार आहे. त्यांचं रंग व डिझाईन याबाबत अद्याप काही समोर आले नाही. ते नंतर कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
– ‘या’ प्रवाशांसाठी सवलत नाही!
जे महिला प्रवासी ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करतील त्या महिलांना जे तिकीट आहे ती पूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे. अशा महिला प्रवाशांना ५० टक्के भाडे सवलत मिळणार नाही.
——————-