बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. कर्मचार्यांनी लावून धरलेले हे आंदोलन सलग चौथ्या दिवशीही ‘जैसे थे’ च राहिले. आज १७ मार्च रोजी कर्मचार्यांनी येथील जयस्तंभ चौकातून भव्य दुचाकी रॅली काढून नारेबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले. पप्पाच्या या लढ्यात एका चिमुकल्याने देखील खारीचा वाटा उचलून, ‘देवेंद्र अंकल ऐकाना, पप्पांना जुनी पेन्शन द्या ना!’ असे फलक हाती धरून हक्काची लढाई सोडून ड्युटीवर परतणार्या काही कर्मचार्यांना लढाईत सामील होण्याचे जणू आवाहन केले आहे.
जुनी पेन्शन स्किमला ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्किम म्हटल्या जाते. नव्या पेन्शन स्किमला एनपीएस म्हणजे न्यू पेन्शन स्किम म्हटले जाते. महाराष्ट्रात २००५ पासून जुनी पेन्शन स्किम बंद झाली. तर पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या गैरभाजप शासित राज्यांमध्ये जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्यात आली आहे. या जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील कर्मचार्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले. परंतु यावर काही तोडगा निघालेला नाही. कर्मचार्यांनी देखील संपातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बुलढाण्यात १४ मार्चपासून विविध आंदोलनांतर्गत शासनाचे लक्ष वेधले जात आहे. आज १७ मार्च रोजी येथील जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद, महसूल आरोग्य कर्मचार्यांनी भव्य दुचाकी रॅली काढली. ‘जुनी पेन्शन हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशी नारेबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. हजारो कर्मचार्यांची ही दुचाकी रॅली जयस्तंभ चौकातून ११ वाजता निघाली मुख्य रोड, त्रिशरण चौक, सर्कुलर रोड, बस स्थानक मार्गे जिजामाता क्रीडासंकुलावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये राज्य सरकारी-निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे तेजराव सावळे, किशोर हटकर, नंदू सुसर, मंजितसिंग राजपुत, गजानन मोतेकर, विलास रिंढे, संजय खर्चे, दादाराव शेंगोकार आदी शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
——————-