वर्ध्यात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने उघडकीस आणले बनावट नोटांचे रॅकेट!
वर्धा (प्रकाश कथले) – बनावट नोटा चलनात आणणार्या चार युवकांच्या टोळीला पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने काल रात्री पवनार येथील नंदीखेडा परिसरातून अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्यांत पवनार येथील प्रीतम प्रदीप हिवरे (वय २३) स्वप्नील किशोर उमाटे (वय २४), साहिल नवनित सकरकर (वय २३) तसेच वर्ध्याच्या श्रीराम टाऊन परिसरात राहणार्या निखिल लोणारे (वय २४) यांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून ५०० रुपयांच्या चलनातील ९४ हजार रुपयांच्या १८८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या देखरेखीत काम करणार्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने केली.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे गुन्हेगारांत पोलिस यंत्रणेचा दरारा पुन्हा स्थापित झाला आहे. त्याचवेळी पोलिस अधीक्षकांच्या थेट नियंत्रणातील क्राईम इंटेलिजन्स पथकाला अॅक्शनेबल इंटेलिजन्स मिळत आहे. पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाला काही काही युवक शहरात बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली होती. हे रॅकेट मागील काही दिवसांपासून शहरात सक्रीय झाले होते. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक या टोळीच्या मागावर होते. अखेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी पवनार येथील तीन, मदनी गावातून एका आरोपीला, अशा चार आरोपींच्या टोळीला अटक केली. विशेष म्हणजे त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बनावट नोटा अशी एकूण ९४ हजार रुपयांची रोकडही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बनावट नोटांचे ‘दिल्ली’ कनेक्शन
चारही आरोपी हे दिल्ली येथून तसेच लगतच्या मोठ्या शहरातून या बनावट नोटा वर्धासह लगतच्या शहरात आणत होते. इतेकच नव्हेतर पानटपरी, पेट्रोलपंप तसेच बाजारपेठेत या बनावट नोटा देत त्या चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या टोळीच्या दिल्ली कनेक्शनचा शोधही घेतला जाणार आहे. मागील काही दिवसांत या चारही युवकांच्या चैनबाज हालचालींची चर्चा पसरली होती. चांगल्या हॉटेलमध्ये नित्याचेच जेवण, इतरही ऐशआरामी शौक त्यांचे सुरू झाले होते. त्यातूनच त्यांच्या आकस्मिक धनलाभाची चर्चा सुरू झाली. अखेर हा धनलाभ बनावट नोटा चलनात आणून होत असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने दाखवून दिले. आता या बनावट नोटांचा मूळ स्त्रोत शोधला जाणार आहे.
यापूर्वी बनावट नोटांबाबत झालेल्या कारवाई!
यापूर्वी १५ फेब्रुवारी २००७ रोजी सिंदी रेल्वे दूध खरेदीच्या चुकार्यात बनावट नोटा देताना, २५ ऑक्टोबर २००९ रोजी पश्चिम बंगालमधील युवकांना, १२ डिसेंबर २००७ रोजी आर्वी येथे इंडिका कारने आलेल्या युवकाला, २९ जानेवारी २००९ रोजी पुलगाव येथे पश्चिम बंगालच्या युवकांना, २९ जानेवारी २०१० रोजी वर्ध्याच्या बाजारपेठेत १ लाख २२ हजारांच्या बनावट नोटा चलनात आणताना पश्चिम बंगालमधील युवकांना, २५ ऑगस्ट २०१० रोजी पश्चिम बंगालच्या दोन युवकांना २० सप्टेबर २०१० रोजी झारखंडच्या दोन युवकांना, २४ जुलै २०१४ रोजी पुसदच्या दोघांना १ लाख ९२ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटांसह, त्यानंतर हिंगणघाट मार्गावर एका घरात बनावट नोटांचा छापखानाच पोलिसांनी पकडला होता. त्यानंतर बनावट नोटा चलनात आणणार्या जिल्ह्यातील चार आरोपींना बेड्या ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
——————-