BULDHANAHead linesVidharbha

साडेचार लाख ग्राहक वीजबिलाच्या कात्रीत!

– वीजबिल वसुलीसाठी कर्मचारी ग्राहकांच्या दारी
– बिलभरून सहकार्य करावे; प्रादेशीक संचालक सुहास रंगारी

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – अकोला परिमंडळात महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ४१ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांकडे अजूनही १४५ कोटी वीजबिल थकीत आहे. आर्थिक वर्षाचे शेवटचे पंधराच दिवस बाकी आहे. महावितरणचे कर्मचारी घरोघरी वीज बिलासाठी पोहचत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही आपले वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे दर महिन्याला वीज खरेदीचे नियोजन करावे लागते. त्यासाठी ग्राहकांनी प्राधान्याने वीज बिल भरले तरच वीज खरेदीचे नियोजन शक्य होऊ शकते. वीज बिल वसुलीसाठी जिल्ह्यातील अभियंते, जनमित्रासह सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी उशीरापर्यंत काम करीत आहेत. प्रादेशीक संचालकही परिमंडलातील थांबलेल्या वीजबिल वसुलीला वेग देण्यासाठी परिमंडलातील वसुली मोहिमेत सहभागी होत आहेत. परिमंडलात मार्च महिन्याचे थकीत वीज बिल वसुलीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी वीजबिल वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खंडित केलेला वीज पुरवठा संपूर्ण थकीत बिल आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच सुरू करण्याचे निर्देश कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. शिवाय खंडित करण्यात आलेल्या ग्राहकाच्या वीज जोडणीची नोंद ऑनलाईन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ४१ हजार ४५९ ग्राहकांकडे १४५ कोटी रूपये वीजबिलाचे थकले आहेत. यामध्ये ११३ कोटी ३६ लाख थकीत रूपये ही घरगुती ग्राहकांची असून, ग्राहकाची संख्या ४ लाख ८ हजार आहे. वाणिज्यिक वर्गवारीतील २७ हजार ३१९ ग्राहकांकडे १७ कोटी ८ लाख रूपयाची थकबाकी आहे, तर औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार ९३४ ग्राहकांकडे १४ कोटी ५५ लाख रूपये वीजबिलाचे थकले आहे.


सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे
थकीत वीज बिलासाठी ग्राहकांची गैरसोय होऊ नये, त्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त वीज ग्राहक महावितरण मोबाईल अ‍ॅप, तसेच महावितरण संकेतस्थळ किंवा ऑनलाईनव्दारे आपले चालू अथवा थकीत वीजबिल भरू शकतात.
———–
प्रादेशीक संचालक वसुली मोहिमेत सहभागी
वसुली मोहिमेला गती देण्यासाठी अकोला परिमंडला अंतर्गत अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील वसुली मोहिमेत प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि उपमहाव्यवस्थाप शरद दाहेदार सामिल होत आहेत.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!