बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर आहेत. छत्तासगड़, राजस्थान सरकार ही पेन्शन योजना देऊ शकते, मग महाराष्ट्र सरकार कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना का देत नाही, असा सवाल करत, अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाड़ें यांनी संपास पाठिंबा दिला आहे.
याबाबत १४ मार्चरोजी दिलेल्या पाठिंबापत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील शासकीय कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना लागू करण्यात आली. यामुळे कर्मचार्यांचा म्हातारपणातील आधारच हिरावून घेण्यात आला. यासाठी वेळोवेळी आंदोलने केली पण पदरात काहीच पड़ले नाही. यासाठी शासनाने योग्य नियोजन केले तर तोड़गा निघू शकतो. सध्या छत्तासगड़, राजस्थान राज्यात जुनी पेंशन योजना तेथील सरकारने लागू केली आहे. तेथे आपल्या सरकारने अभ्यासगट पाठवून माहिती घ्यावी, पण तसे करायलाही शासनाची मानसिकता नाही. पेंशन हा कर्मचार्यांचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे, यासाठी राज्य कर्मचारी करीत असलेल्या संपास आपला पाठिंबा आहे, असे आ. लिंगाडे यांनी पत्रात नमूद केलेले आहे.
——————-