बुलढाणा (विशेष प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला असून, या संपात जिल्ह्यातील ३० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, या संपामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र दिसून आले. मात्र शासकीय कर्मचारी व सरकारच्या या संघर्षामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि विविध योजनांच्या लाभार्थींची कामे खोळंबली आहेत.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ मार्चच्या सकाळी ११ वाजता जुनी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला प्रारंभ केला. यावेळी पदाधिकार्यांनी सांगितले की, आता ही लढाई आर- पारची असून, जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करीत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. दरम्यान, या संपामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळा व सरकारी कार्यालये कुलुप बंद असल्याचे दिसून आले. जिल्ह्याच्या महसूल विभागातील ३१ वर्ग एकचे अधिकार्यांनी १३ मार्च २०२३ रोजी एका दिवसाची रजा घेवून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला पाठींबा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ग २ चे तीन अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत. वर्ग ३ चे ४३५ कर्मचारी व वर्ग ४ चे ९६ कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. हा आंकडा फक्त महसूल विभागाच्या कर्मचार्यांचाच आहे. इतर विभागातील कर्मचार्यांची संख्या पाहता जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती आहे.
———————-