बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील उदयनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे नुकसान झालेले आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून शेतकर्यांच्या नुकसानीची दखल घेण्यात आलेली नाही. या विरोधात उदयनगर मधील शेतकर्यांनी बुधवार, १५ मार्च रोजी मुख्य रस्त्यावरील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला. यावेळी चिखली तहसीलचे नायब तहसीलदार मुंडे यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन शेतकर्यांना ८ दिवसात मदत मिळण्याचे आश्वासन दिले.
उदयनगर परिसरात २८ डिसेंबर २०२१ रोजी अतिप्रमाणात गारपीट झाली होती. त्यामध्ये तूर, हरभरा, गहू, संत्रा, भाजीपाला, अश्या अनेक प्रकारच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले होते. तलाठी, कृषी अधिकारी यांनी हया नुकसानीचे पंचनामेसुध्दा केलेले आहेत. तरी शेतक-यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मदत मिळालेली नाही. शेतकर्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी उदयनगर महामार्गावरील मुख्य चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकर्यांकडून घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली. शेतकर्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या आक्रमकता पाहता महसूल विभागाने आंदोलनाचे दखल घेत चिखली तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुंडे यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेऊन सर्व शेतकर्यांना गारपिटीच्या नुकसानीचे त्यांच्या खात्यामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये पैसे जमा होतील, असे आश्वासन देऊन शेतकर्यांच्या आंदोलन सोडविले.