– सावित्रीच्या लेकींसाठी शासकीय वसतीगृहांची संख्या वाढवा!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – बुलढाण्यातील कॅफेच्याआड चालणारे अश्लील चाळे व गैरप्रकाराचा मुद्दा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विधीमंडळात उपस्थित केला. तसेच, कॅफेतील गैरप्रकार रोखण्यात बुलढाणा पोलिस अपयशी ठरत असल्याची नाराजीही व्यक्त करत, याप्रश्नी सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी केली. विशेष बाब म्हणजे, याप्रश्नी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षित वागणूक न मिळाल्याचा मुद्दाही चर्चेत आला होता. आता गृहमंत्रालय कॅफेतील गैरप्रकारप्रश्नी काय भूमिका घेते, याकडे बुलढाणेकरांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, मातृतीर्थ जिजाऊं व सावित्रीच्या लेकींच्या बुलढाणा जिल्ह्यात शिक्षणाची गंगा वाहत असली तरी, बाहेर गावावरून शिक्षणासाठी येणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या बघता, पुरेशा क्षमतेचे शासकीय वसतीगृह नाहीत. त्यामुळे शासनाने शासकीय वस्तीगृहाची संख्या वाढवावी, या मागणीकडेदेखील आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शासनाचे लक्ष वेधले.
बुलढाण्यातील कॅफेचाप्रश्न आज विधानसभेत पोहोचला. आज-काल एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा सोबत वेळ घालविण्यासाठी प्रेमीयुगुलांना कॅफेचा आधार मिळू लागला आहे. कॅफेच्या बंद केबिनमध्ये मग नको ते प्रकार होतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु हा गैरप्रकार थांबला पाहिजे, यासाठी सकल मराठा समाजाने १ मार्चला जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलिसांनी कॅफेवर धाडी टाकून कॅफे चालकांचे कान टोचले. मात्र आज १५ मार्च रोजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॅफेचा मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे उपस्थित करून, पोलीस यंत्रणेने कॅफेवर कोणतीही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत, शासनाने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी रेटली आहे. बुलडाणा शहरातील व ग्रामीण भागातील अनेक कॅफेत पलंग, छोटे रूम, दरवाजा कडी असून, त्याआड अनेक प्रेमीयुगुल नको त्या गोष्टी करीत असतात. कॅफे मालक तासाप्रमाणे पैसे घेतो. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. यावर त्वरित आळा घालावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती. ही मागणी आज डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिवेशनात उपस्थित केली. कॅफेमधील गैरवर्तन रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. विशेष म्हणजे, कॅफे चालू करतांना दरवाजे लावण्याची गरज का भासते? हाही एक मोठा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. तसेच कॅफेमध्ये जाऊन निरीक्षण केले असता, कॅफेमध्ये एकदम अंधार दिसून येतो. सदर कॅफेला कॅबिन बसवण्याचीच गरजच का आहे? असाही सवाल आहे. तसेच अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे सोपे असते. कारण त्यांना भविष्याबाबत योग्य ती जाण नसते. प्रियकर आपल्यावर जीव ओवाळून टाकतोय म्हणजे तो ‘हिरो’ आहे, असा मुलींचा समज असतो. वयात येत असताना लग्नाबाबत आकर्षणही असते. दोघेही पळून नातेवाईकाकडे जातात किंवा कुठेतरी कामाच्या शोधात निघून जातात. मात्र, महिन्या-दोन महिन्यातच त्यांच्या मुलीला संसाराचे चटके बसू लागतात. परंतु, घरी परतण्याची इच्छा असूनही त्यांना घराची वाट धरता येत नाही. अशा मुलींनी पळून जाण्याच्या घटना बुलढाणा जिल्ह्यात वाढीस लागल्या आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात जावे लागते. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणून शासनाच्यावतीने शासकीय वस्तीगृहाची निर्मिती केली आहे. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व वसतिगृहाच्या मर्यादित संख्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेअभावी प्रवेश मिळत नाही. चालू वर्षातदेखील बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये अद्यापही प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने वाढती विद्यार्थी संख्या बघता वसतीगृहांची संख्यादेखील वाढवावी, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. तर याबाबत शासन योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन संबंधित मंत्र्यांनी दिले आहे.
दामिनी पथक करते तरी काय..?
बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे दामिनी पथक करते तरी काय? असाही प्रश्न उभा झाला आहे. रोज शहरामध्ये दामिनी पथकाचे वाहन फिरताना दिसते. मात्र त्यांचे कॅफेकडे लक्ष का जात नाही? दामिनी पथकाने आतापर्यंत कॅफेवर किती कारवाया केल्या..? किती कॅफेची तपासणी केली..? हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
——————