LONARVidharbha

‘सरोवराचे’ लोणार तहानलेले!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – उन्हाळा वाढू लागल्यामुळे जगप्रसिद्ध लोणार सरोवर असलेल्या तालुक्यातील तहानलेल्या रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान खंडाळा, देवा नगर, सोमठाणा, खापरखेडा,अंजनी खुर्द आदी गावांमध्ये अनियमित येत असल्याने, विहिरींचे अधिग्रहण किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे रेटली आहे.

यंदा सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली आहे.मात्र, वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी घटू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जागतिक कीर्तीचे खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार तालुक्यातील खंडाळा, देवा नगर, सोमठाणा, खापरखेडा ,अंजनी खुर्द आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.मार्च महिन्यातच या गावांमध्ये 15 ते 20 दिवस नळ येत नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासकीय नियोजन दिसून येत नाही. परिणामी विहिरींचे अधिग्रहण किंवा टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि बंद पडलेले बोरवेल्स सुरू करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बाबत आढावा घेऊन ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा सुरळीत होणे बाबत उपाययोजना कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे.पंचायत समिती लोणार यांचे वतीने विस्तार अधिकारी आर.एन. मुंडे यांना हे निवेदन देण्यात आले. पाणीटंचाईचे तात्काळ निवारण होणे बाबत बीडिओ यांनी उपाययोजना कराव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड, तालुका अध्यक्ष दिलीप राठोड यांनी दिला. यावेळी महासचिव सुनील इंगळे, बळी मोरे ,महिला नेत्या मालती कळंबे, युवा नेते गौतम गवई, सल्लागार समाधान डोके, प्रा. शिवप्रसाद वाठोरे , रमेश प्रधान , सचिन लांडगे , दयानंद कांबळे राहुल चव्हाण, विनोद इंगळे,विकास मोरे, बद्री घुले यांचे सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!