बुलढाणा (खास प्रतिनिधी) – इ क्लास जमिनीचे भाडेपट्टे देण्यात यावे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी. निवासी आश्रम शाळा देण्यात यावी आणि वैयक्तिक योजनेचा लाभ नियमित देण्यात यावा आदी मागण्यांच्या न्याय हक्कासाठी येथील कलेक्टर ऑफिस समोर फासेपारधी समाजाने आज 15 मार्च रोजी ‘बि-हाड’आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता.
आदिवासी जमात विविध शासकीय योजनांसाठी पात्र आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांची स्वप्ने फाईलबंद झाली आहेत. त्यांच्यासाठी कार्यान्वित योजनांचा लाभ कुणीही लाटून घेतो. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील फासेपारधी समाज संघटना एकवटली. दरम्यान आज बुलढाणा कलेक्टर ऑफिस समोर त्यांनी मागण्यांचा पाढा वाचला. कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे, विविध प्रकारचे दाखले घरबसल्या मिळावेत,आदिवासी आश्रम शाळा मंजूर करून द्यावी, विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी समाजातील पंचांशी चर्चा करावी, आदिवासी विकास विभागाचे दुय्यम कार्यालय बुलढाणा मुख्यालयी करून द्यावे, यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. त्यांच्या या बिऱ्हाड आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. आंदोलनात फासेपारधी नेते युवराज पवार, दिपू पवार, आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा नंदिनीताई टारपे, जिल्हाध्यक्षा रत्नाताई पवार, मूलनिवासी मंचचे प्रशांत सोनुने आदिंसह असंख्य महिला पुरुष व विद्यार्थी सहभागी झाले होते.