बुलढाणा (प्रशांत खंडारे) – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात मंगळवार पासून आरोग्य विभागाचे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून, दुसऱ्याही दिवशी त्यांचा मागे न हटण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा देत आरोग्य विभागाचा डोलारा सांभाळला असला तरी, आंदोलनाची ठिणगी पेटलेली दिसून येत आहे. आज 15 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात केलेली निदर्शने लक्षवेधी ठरली.
जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील औषध निर्माण अधिकारी, लिपिक कर्मचारी, परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी झाले. त्यामुळे आरोग्यसेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची भीती बळवली आहे. परंतु कंत्राटी कर्मचारी सेवा देत असून, आपत्कालीन सेवेत संपकऱ्यांची मदत रुग्णांना लाभणार असल्याचे अमित किन्हीकर यांनी सांगितले. शासनाने कितीही दबाव आणला तरी ताकतीनिशी लढा सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना तात्काळ लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने हा संप पुकारला. या संपामध्ये रुग्णालयातील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी झाले आहेत.