– देशभरात ईपीएस पेन्शनर्सचा रास्ता रोको!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – गेल्या सात वर्षापासून भारताचे इंडस्ट्रियल वर्कर्स आयुष्यभर अंशदान करीत आले. मात्र म्हातारपणीदेखील त्यांच्या पदरात एक हजार रुपयांची पेन्शन मिळते. यालाच विरोध म्हणून पेन्शनच्या वाढीव मागणीसाठी संपूर्ण देशात ईपीएस पेन्शनधारकांनी आक्रमक पवित्रा घेत, आज १५ मार्चला रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात म्हातार्यांनी चक्क रस्त्यावरची लढाई लढत अक्षरशा रस्त्यावर लोटांगण घेतले. दरम्यान, काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती तर पोलीस दलाची त्रेधात्रिपीट उडाली.
ईपीस ९५ पेंशनर्सचे१५ मार्चला रास्ता रोको आंदोलन असल्याची माहिती तत्पूर्वी कमांडर अशोक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. परंतु सरकारच्या सततच्या दुर्लक्षामुळे नेहमीप्रमाणे यावेळी आंदोलनाच्या इशार्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नाईलाजास्तव म्हातारपणी देखील पेन्शनधारकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.ईपीस पेंशनर्स दयनीय व मरणासन्न अवस्थेत जीवन जगत आहेत. ईपीएस ९५ संघटनेने सरकारला किमान ७५०० रूपये पेंशन व महागाई भत्त्याची घोषणा करावी ,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. देशातील औद्योगिक सार्वजनिक सहकारी खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्त ज्यात प्रामुख्याने एस टी महामंडळ, वीज मंडळ, सहकारी बँका, पतसंस्था, साखर उद्योग, विना अनुदानित शाळा महाविद्यालये, बियाणे महामंडळ, वन विकास महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, वस्त्रोद्योग महामंडळ, बजाज, टाटा मोटर्स सारखे असंख्य १८६ उद्योगात काम केलेल्या ईपीस ९५ पेंशन धारकांची संख्या ७० लाख आहे.
या कामगारांनी दरमहा ४१७,५४१,१२५० रूपये अंशदान पेंशन फंडात दिले आहे आणि देश निर्मिती मध्ये ऐन तारुण्यातील ३० ते ३५ वर्ष खर्ची घातले, रक्तच नाही तर घाम गाळून देश समृद्ध बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र त्यांना आज सरासरी पेंशन ११७१ रूपये आहे. कितीही महागाई वाढली तरी त्यात कवडीची वाढ होत नाही. पती पत्नीला जीवन जगण्यासाठी किमान मासिक पेंशन रू ७५०० रुपये व त्याला महागाई भत्ता, सुप्रीम कोर्टाचे निर्णयानुसार पेन्शनरमध्ये कोणताही भेदभाव न करता वास्तविक वेतनावर अंशदान घेऊन उच्च पेंशन, वृद्धापकाळात मोफत वैद्यकीय सुविधा, या योजने पासून वंचित ठेवलेल्या कामगारांचा समावेश करुन त्यांना किमान मासिक ५००० रूपये या प्रमुख मागण्यासाठी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने सर्व आंदोलने केलीत.
अधिकारी पदाधिकारी,मंत्री यांच्या सह पंतप्रधानपर्यंत भेटी, चर्चा, निवेदने दिलीत. आश्वासने मिळालीत. मात्र सकारात्मक निर्णय अद्यापही नाहीं. संघटना देशातली २७ राज्यांत कार्यरत असून या संघटनेचे मुख्यालय बुलडाणा आहे. या ठिकाणीं गेल्या १५४० दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे. उन, वारा, पाऊस याची कुठलीही पर्वा न करता हे वृद्ध पेंशनधारक साखळी उपोषण करीत आले. शासन दुर्लक्षित असल्याने देशभर रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग संघटने निवडला. बुलढाण्यात हे आंदोलन कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वाखाली पुकारण्यात आले. शेकडो महिला व पुरुषांसह ईपीएस ९५ चे राष्ट्रीय महासचिव विरेंद्र सिंग राजावत, विलास पाटील, जे.जे. गरकल, पी. आर. गवई, सुधीर चांडगे, एस. एस. नारखेडे, एन. एम काझी, इंजि. भावसार, सरिता नारखेडे त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.