बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकरी हल्ली मेटाकुटीस आलेला असताना, शेतमाल चोरींच्या घटनांची आणखी भर पडत आहे. दरम्यान एसपी सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनात आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने केलेल्या 14 मार्च रोजीच्या एका कारवाईत शेतमाल व डिझेल चोरी करणारे 2 आरोपी गजाआड करण्यात आले आहे. संदीप रामकिसन डीघोले (24) रा. झोटिंगा ह.मु. शिवनी अरमाल ता. देऊळगाव राजा, शंकर एकनाथ बकाल (35) रा. खट्याळ गव्हाण ता. देऊळगाव राजा असे या चोरट्यांची नावे आहेत.आरोपींकडून एक वाहन सुद्धा जप्त करण्यात आले. परंतु चोरलेला शेतमाल मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन, तूर, हरभरा अशा शेतकऱ्यांच्या शेतमालावर अनेक चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी गेलेला मुद्देमाल व चोर पकडल्यानंतर मूळ मालकाला द्यावा लागतो. मात्र तूर व सोयाबीन सारख्या शेतमालाची ओळख पटत नसून, खरेदी करणार्या व्यापार्यांनीही कायद्याच्या चौकटीत राहूनच खरेदी केली असल्यामुळे तो माल शेतकर्यांना परत करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी करताना व्यापार्यांना शेतकर्यांचा सातबारा पाहण्याचा कायदा नाही. त्यामुळे व्यापार्यांनी खरेदी केलेला शेतमाल चोरीचा आहे हे सिद्ध झाले तरी तो जप्त करता येत नाही. दुसरीकडे चोरट्यांकडून जप्त केलेली तूर किंवा सोयाबीन कुणाचे, हे ओळखणे कठीण आहे. असे असले तरी यासाठी एलसीबी प्रयत्न करत आहे. चोरटे संदीप डीघोले व शंकर बकाल त्यांना शेतमाल व डिझेल चोरीची सवय जडली आहे. त्यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाणे अंतर्गत कलम 461,380,379 तर देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत ही 379 नुसार गुन्हे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी देऊळगाव राजा, बीबी,लोणार,सिंदखेडराजा, अंढेरा, साखरखेर्डा, बुलढाणा ग्रामीण या हद्दीमध्ये सुद्धा रात्री दरम्यान संशयास्पद हालचाली केल्याचे सीडीआरच्या तांत्रिक विश्लेषणावरून निष्पन्न झाले. त्यामुळे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींकडून मुद्देमाल जप्तीची तजबीज सुरू आहे. आरोपींकडून एक वाहन जप्त करण्यात आले असून, चिखली पोलीस ठाण्याला हे प्रकरण वर्ग करण्यात आले. ही कारवाई पीएसआय कानडे,एचसी राजपूत, शरद गिरी,एनपीसी गजानन दराडे,दिनेश बकाले, विजय वारुले, गोपाल राठोड, संजय भुजबळ,सचिन जाधव या पथकाने केली.