Breaking newsBuldanaPolitical NewsPolitics

दोन्ही आमदार शिंदे गटात.. खासदार म्हणतात- मी नाही कटात!

बुलडाणा(✍️ राजेंद्र काळे )

“शिवसेनेत पहिला भूकंप झाला, १९९२ला. भूजबळ, राणे, राज ठाकरेनंतरचा हा बंडाचा ४था भूवंâप २०२२ला. या ३ दशकात झालेल्या पहिल्या अन् चवथ्या सेनेतील भूकंपाचा केंद्रबिंदू राहीला, बुलडाणा जिल्हा. तेंव्हा डॉ.राजेंद्र गोडे व कृष्णराव इंगळे फुटले होते, तर आता ‘जहाल’ म्हणविले जाणारे आमदार संजय गायकवाड व ‘मवाळ’ असणारे आमदार डॉ.संजय रायमुलकर. शिंदेसोबत कोण कोण आमदार? हे जेंव्हा शोधण्याचा २१ जूनला पहिला प्रयत्न झाला, तेंव्हा पहिल्यांदा हेच २ संजय निघाले होते.. नॉटरिचेबल!”

 

“नॉटरिचेबल, म्हणजे संपर्कक्षेत्रात ते सर्वांसाठीच काय.. संपर्कप्रमुख खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठीही होते. त्यांचा अन् आपला ३ दिवसांपासून संपर्क नसल्याचे खा.जाधव पहिल्यांदा म्हणाले होते. ‘२०जूनला मी दिवसभर शेतात काम करत होतो, थकल्यामुळे रात्री लवकर झोपलो.. २१ जूनला सकाळी उठून टिव्ही. बघतोतर काय दोन्ही संजू गायब. त्यांचा फोन लावून बघतोतर नॉटरिचेबल’ असं प्रतापरावांचं पहिलं स्टेटमेंट होतं. म्हणजेच त्यांना असं सुचवायचं होतं की, शिंदेंनी पुकारलेल्या बंडाच्या.. मी नाही कटात!”

 

*दोन्ही आमदार शिंदे गटात..*

राज्याचं राजकीय वातावरण कमालीचं ‘अस्थीर’ बनलंय. पहिले वाटायचं, मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडलयं.. उद्या सकाळी राजीनामा देणार, परवा फडणवीस मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. बस शिवसेनेचा खेळ खल्लास, कधी वाटायचं अडीच वर्ष खतम झाल्यामुळे हे सर्व उध्दव ठाकरेंनीच घडवून आणलं. पण मुख्यमंत्री ठाकरेंनी जसा ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’कडे प्रवास सुरु केला, तसं शिवसेनेतलंच काय सामान्य वातावरणही भावनिक होवून गेलं. जे सेनेचे कायम वैचारीक विरोधक राहीले त्यांनाही मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ फेसबुक लाईव्ह अन् ‘वर्षा’वरुन सुरु केलेला परतीचा प्रवास नकळत डोळ्यात पाणी आणून गेला. शिंदेंच्या बंडात आघाडीवर होते, बुलडाणा जिल्ह्यातील ‘संजय’ नावाचे दोन आमदार.. त्यात बुलडाण्याचे गायकवाड व मेहकरचे रायमुलकर. डॉ.रायमुलकर हे आता तिसऱ्यांदा आमदार असून, राज्यमंत्रीपद दर्जा असणाऱ्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष आहेत. वास्तविक हे दोन्ही कार्यकर्ते शिवसेनेच्या नावावर नेते बनलेले, पण मंत्रीपद मिळालं नसल्याचं शल्य रायमुलकरांना होतं.. ती खदखद या बंडातून बाहेर पडली. ‘तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करण्यात येवू नये?’ ही जी १६ आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे, त्यात रायमुलकर यांचाही समावेश आहे. गायकवाड यांचा राजकीय जन्म शिवसेनेतच. छावा, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे फिरुन झाल्यावरही जी आमदारकी त्यांना मिळाली नाही, ती शिवसेनेत घरवापसी झाल्यावर २०१९ला ‘डंके की चोट पे’ मिळाली. संजुभाऊंचा बाणा तसा कट्टर हिंदुत्वाचा, तसे ते आजही शिवसैनिकच असल्याचे सांगतात. अतिशय आक्रमकपणे भाजपा नेत्यांना कोणत्या सेना आमदाराने घोडे लावले ते संजुभाऊंनीच. फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतु कोंबण्याची भाषा वापरली होती त्यांनी. आज तेच संजुभाऊ सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपा सोबत जाण्याच्या भाषा वापरत आहेत. शिंदे गटात ते बिनीचे शिलेदार बनलेत. जनसंपर्वâ कार्यालयाचे नाव ‘मातोश्री’ ठेवणारे व उध्दवजींना कोणी अंगावर घेतलेतर त्याला शिंगावर घेणारे संजुभाऊत झालेला बदल, ही तत्कालीन परिस्थितीची गरज असू शकते. बंडखोरांचा इतर ठिकाणी विरोध सुरु असतांना, बुलडाण्यात मात्र आ.गायकवाड यांच्या समर्थनार्थ सैनिक रस्त्यावर उतरुन आवाज कुणाचा? शिवसेनेचा!’ घोषणा देतांना दिसले. मात्र असे असले तरी सध्या बुलडाणा जिल्ह्यातील दिसतात,

दोन्ही आमदार शिंदे गटात!

 

खासदार म्हणतात- मी नाही कटात!

शिंदे गोटात बुलडाणा जिल्ह्यातील २ आमदार गेलेले असतांना, त्यांचे ‘फस्र्ट लिडर’ असलेले खा.प्रतापराव जाधव मात्र कमालीचे सावध आहे. सेनेने हिंदुत्ववादी पक्षांसोबत राहून मतांची विभागणी टाळावी, असे आवाहन ते करत असलेतरी.. प्रत्येक पाऊल विचार करुन टाकत आहे. दोन्ही ‘संजय’ प्रतापरावांच्या सांगण्यावरुन कुठेच जावू शकत नाही, हे वास्तव असलेतरी.. ते जातांना या दोघांचा कुठलाही संपर्वâ झाला नव्हता, असे प्रतापरावांनी आधीच सांगून टाकून सफाईने हात झटकले. २१ जूनच्या सायंकाळपर्यंत प्रतापराव हे जिल्ह्यातच होते, २२ जूनला ते मुंबईला गेले. तर २३ जूनला ते ग्रामविकास समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत होते. शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीसाठी २४ जूनला ते मुंबईत ‘मातोश्री’वर पोहोचले. या संपुर्ण घडामोडी दरम्यान प्रतापरावांनी शिंदे गट जो भाजपासोबत जाण्याची मागणी प्रत्यक्षपणे करत आहे, त्याला अप्रत्यक्ष पाठींबा देत असतांनाही.. दुसरीकडे ते शिवसेनेबरोबरच असल्याची प्रत्यक्ष भूमिका जाहीर केली. खा.प्रतापराव जाधव हे धुरंधर राजकारणी आहेत. राजकीय गारुडी असणाऱ्या सुबोध सावजींच्या विरोधातून उभे झालेले ते नेतृत्व आहे. राणेंच्या बंडातही त्यांचे नाव आले होते, पण तेंव्हा त्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली. मराठा मूक मोर्चादरम्यान ‘सामना’ने छापलेल्या ‘मुका घ्या मुका’ या व्यंगचित्राविरोधात त्यांनी जाहीरपणे विरोधाची भूमिका घेतल्याने इतिहासात ‘सामना’ला पहिल्यांदा दिलगीरी व्यक्त करावी लागली होती. आ.डॉ.संजय रायमुलकर यांना मंत्रीपद न मिळाल्याने, उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शिवतिर्थावरील शपथविधीकडे त्यांनी पाठ फिरवली. ज्या राष्ट्रवादीचा लोकसभेत त्यांनी तिनदा पराभव केला, त्याच राष्ट्रवादी नेत्याला आघाडीने पालकमंत्री केल्याने जिल्हा प्रशासन बैठकीत खासदार म्हणून त्यांना जे दुय्यम स्थान मिळते.. त्याचाही रोष त्यांच्या मनात असणे स्वाभाविक. म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपासोबत जाण्याला शिंदेंच्या आधीपासून अनुकूल होते. तसे ते सेनेत एकनाथ शिंदेंनाही सिनीअर आहेत. म्हणून पक्षाला हे रोखठोक सुनावतांना त्यांनी कधी पक्षविरोधी भूमिका घेतली नाही. या घडामोडीतही ते ‘न्यूट्रल’ आहेत. चिखलीत शिंदेंविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले, पण जिल्ह्यातील २ आमदारांचा निषेध केला नाही. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्यातील सेना उध्दवजीं- सोबत असल्याचे सांगितले. एवूâणच दोन्ही आमदार शिंदे गोटात गेले असलेतरी, वातावरण आहे ते..

खासदार म्हणतात- मी नाही कटात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!