BuldanaGuvahatiPolitical NewsPolitics

झाडी, डोंगाराच्या ‘त्या’ हाटील मध्ये तिसरे संजूभाऊही..

बुलडाणा (राजेंद्र काळे)

ती झाडी, काय तो डोंगार..

अन काय ती हाटील..

एकदम ओक्के !’

असं बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्या व्हायरल कॉलवरून गाजत असलेल्या व बंडखोर शिवसेना आमदार थांबलेल्या गोहाटीच्या हॉटेल ‘रेडिसन ब्लु’ मध्ये भाजपा आमदार डॉ. संजय कुटेही असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे. विशेष म्हणजे ते सुरतपासूनच या सेना आमदारांच्या सोबत असल्याचे कळते !

 

शिवसेनेच्या बंडाशी काहीही संबंध नसल्याचे भारतीय जनता पार्टी कितीही सांगत असलीतरी, सुरतमधल्या ‘ली मेरिडियन’ हॉटेलमध्ये सर्वप्रथम पोहचले होते, ते भाजपाचे जळगाव जामोदचे आमदार तथा देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी डॉ. संजय कुटे हेच. या बंडखोरांसोबत थेट चर्चा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रत्यक्ष त्यांच्यावर सोपविण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. बंडखोरांच्या एकूण घडामोडीवरच डॉ. कुटे हे थेट लक्ष ठेवून आहेत. जसा बंडखोर आमदारांचा मुक्काम गोहाटीला हलला, त्यांच्यासोबतच चार्टर्ड प्लेनमधून आ. संजय कुटे पोहोचले व त्या दिवसापासून ते तिथेच मुक्कामी असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

 

म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील संजय नावाचे तिन्ही आमदार गोहाटीलाच ‘काय ती झाडी, काय ते डोंगाराच्या, काय त्या हाटील’ मध्ये ‘एकदम ओक्के’ मध्ये असल्याची माहिती आहे. त्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड व संजय रायमुलकर तर भाजपाचे आ. डॉ. संजय कुटे यांचा समावेश असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.

 

पळणारे ते आमदार कुटेच..?

गोहाटीला जाण्यासाठी ज्या विशेष विमानाची सोय करण्यात आली होती, त्याला पकडण्यासाठी सुरत एअरपोर्टवर पळणाऱ्या आमदाराचा व्हायरल झालेला व्हिडिओ दोन दिवसापासून जबरदस्त चर्चेत आहे. त्या आमदाराचा चेहरा मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लपविण्यासाठी सुरक्षारक्ष ही चांगलीच कसरत करत होते, व ते आमदारही मागे वळून न पाहता पुढे पळत होते. शिवसेनेच्या आमदारांना अशाप्रकारे विमानात कोंबले असल्याची चर्चा व्हायरल व्हिडिओनंतर होत होती. मात्र मीडियापासून लपवले जाणारे ते आमदार शिवसेनेचे नव्हते, तर ते भाजपाचे डॉ. संजय कुटे होते. म्हणजेच सेनेच्या या बंडात भाजपचा हात नसल्याचा प्रकारच या धावपळीतुन गुजरात पोलिसांच्या माध्यमातून लपविल्या जात होता की काय ? अशी शंका आता उपस्थित होत आहे. त्या पळणाऱ्या आमदारांची उंची व शरीरयष्टी ही मागून पूर्णतः डॉ. कुटे यांच्यासारखीच दिसत होती. त्यामुळे ते आमदार दुसरे-तिसरे कोणी नव्हतेतर भाजपाचे डॉ. संजय कुटे होते, हेही आता स्पष्ट झाले आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!