बुलढाणा (प्रशांत खंडारे) – ‘कितने आदमी थे’ हा शोले चित्रपटातील डायलॉग मनामनावर कोरला गेला आहे. रिकाम्या हाताने परतलेल्या गुंडांना शिक्षा देताना अमजद खान म्हणतोय..’ छे गोली और आदमी तीन, ‘बहुत नाइन्साफी हैं!’ हा डायलॉग आठवण्याचे कारण की, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राण्यांची वाढती संख्या पाहता, इथे फक्त वन्यजीवांच्या तृष्णातृप्तीसाठी ६० पाणवठे तयार आहेत. पाणवठ्यांत नियमित पाणी सोडले जाते का? हा ही एक प्रश्न आहे. दरम्यान, वन्यजीवांच्या तुलनेत वनविभाग पाणवठ्यांच्या संख्येबाबत ‘नाइन्साफी’ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वन्यजीवांची उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ६० ते ६४ पाणवठ्यांवर भिस्त आहे. वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यातील पाणवठे वन्यजीवांसाठी मोठा आधार ठरतात. गेल्या वर्षी बुलडाणा वन्यजीव विभागाने ३० सिमेंट बंधारे, ६४ कृत्रिम पाणवठे, २० माती बांध, १८ वनतळे अशी व्यवस्था करून ठेवली. येणार्या काही दिवसात आणखी पाणवठे तयार केल्या जातील, असे सांगण्यात आले. अभयारण्यात वन्यजीवांचा स्वच्छंद वावर वाढीस लागला आहे.
बुलडाणा, खामगाव, मोताळा, चिखली या ४ तालुक्यांच्या सीमेवर विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट, अस्वल, नीलगाय, रानडुकर, कोल्हा आदी विविध प्रजातीचे वन्यजीव आहे. जैवविविधतेने समृद्ध ज्ञानगंगा अभयारण्यात निसर्गाची मुक्त उधळण मोहून टाकणारी आहे. विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात ६० ते ६४ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. जंगल क्षेत्रातील काही जलस्त्रोत उन्हाळ्यात आटू लागतात. जलस्त्रोत आटले तर वन्यप्राणी पाण्यासाठी मनुष्यवस्तीत धाव घेऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता वन्यजीव विभागाने आणखी पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे. अन्यथा, वन्य प्राण्यांच्या संख्येच्या तुलनेत निर्मित पानवट्यांची संख्या ही ‘नाइन्सफी’ ठरू शकते!