आळंदी (अर्जुन मेदनकर) – देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांनी आळंदी मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात गर्दी केली. रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा – माउली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला. आळंदी परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. इंद्रायणी नदी घाटावरदेखील भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर आणि नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात केली.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात देवस्थानच्यावतीने श्रींचे सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. परतीचे प्रवासात भाविकांनी आळंदी दर्शन करीत निघाल्याने मंदिर परिसरात गर्दी होती. इंद्रायणी नदी परिसर घाट, मंदिर रस्ते गर्दीने फुलले होते. भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच खाजगी वाहनाने ये-जा करताना दिसत होते. पुणे महानगर परिवहन सेवेने देखील भाविकांची व्यवस्था केली होती. यात राज्य परिवहन सेवेने प्रवासी बस सेवा उपलब्द्ध करून दिल्या होत्या. मंदिर परिसर आणि इंद्रायणी नदी काठी भाविकांच्या गर्दीने व्यावसायिकांची देखील गर्दी झाली होती. मंदिरात भाविक महिलांचे दागिने चोरी होऊ नये म्हणून आळंदी पोलिसांच्यावतीने समाधी मंदिरात महाद्वार आणि घाटावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर देवस्थानच्यावतीने ध्वनिक्षेपकांवरून महिलांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. देहू, आळंदी, पंढरपूर देव दर्शन करून काही भाविक यात्रा करीत असतात. या वर्षीही राज्यभरातून भाविकांनी आळंदीतील माऊलींच्या मंदिरात सकाळ पासूनच गर्दी केली होती. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर देहूत बीज सोहळ्यास आदी उपस्थित होते.
भाविकांना कमी वेळेत सुरक्षित,सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी आळंदी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस बंदोबस्त तैनात होता. मंदिराकडे रस्त्यावर दुकानदारांची दुकाने थाटल्याने भाविकांना ये-जा करण्यास काहीसे त्रासाचे झाले. नगरपदक्षिणा मार्गावर दुहेरी वाहतुकीने वाहतुकीचे कोंडीस काही वेळ सामोरे जावे लागले.