AalandiHead linesMaharashtraPachhim Maharashtra

देहूत संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात!

आळंदी/देहू (अर्जुन मेदनकर) – जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळा गुरुवारी ९ मार्च मोठ्या आनंदात देहूमध्ये पार पडला. तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत आले होते. यावेळी देहू मंदिरातील धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत कीर्तन, प्रवचन, पंचक्रोशीत धार्मिक अखंड हरिनाम सप्ताह तसेच धार्मिक परंपरांचे पालन करीत साजरा झाला. मोठ्या उत्साहात अन्नदान, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देहू देवस्थान, देहू नगरपंचायत यांनी सुसंवाद साधून भाविक वारकरी यांना सेवा-सुविधा देत आपली सेवा रुजू केली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले, अशी लोक समजूत आहे. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. यंदाचे बीज सोहळ्याचे ३७५ वर्षे आहे. या निमित्ताने देहू नगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्याहस्ते श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. पहाटे साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. पहाटे सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. या सोहळ्यासाठी इंद्रायणी परिसर, मंदीर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!