– चारही शिक्षक खासगी संस्थांवर कार्यरत, सद्या पोलिस कोठडीत
सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या गणित विषयाचा पेपर फोडल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्या चार शिक्षकांचे जिल्हा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी निलंबन केले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे. निलंबनाची कारवाई झालेले सर्व शिक्षक हे विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत होते. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यावरून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून, तिथेच शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर अ. अकील अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होता. या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजेगाव येथील परीक्षा केंद्रावरील बारावी गणिताचा पेपरफुटीचे प्रकरण राज्यभर गाजले. विधानसभेतही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे प्रकरण लावून धरले होते. परिणामी, शासनाने तातडीने सूत्रे हलवली. सरकारने सद्या एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास चालवलेला आहे. या प्रकरणात हे चार शिक्षक आणि कॉपी पुरवण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करणार्या बाहेरच्या तीन जणांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे. या पेपरफुटी प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाचे नेतृत्व मेहकरचे एसडीपीओ विलास यमावार हे करत आहेत. यामावार हे पोलिस अधिकारी होण्यापूर्वी बारा वर्षे शिक्षक होते. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने तात्काळ म्हणजे, ३६ तासात त्यांनी सात आरोपींना अटक केली होती.
बारावी गणिताचा पेपर व्हायरल करणाऱ्यांमध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतः च्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून, तेथेच शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होता. आतापर्यंत अनेक शिक्षकांची चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोषी आढळणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.