राज्याचा ५० टक्के हिस्सा कधी जाहीर होणार? सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच सरकारला धारेवर धरले!
– आ. संजय कुटे, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, श्वेता महाले झाले आक्रमक!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यासह आ. संजय गायकवाड, आ. संजय कुटे, आ. संजय रायमुलकर यांनी चांगलाच उचलून धरला. बहुप्रतिक्षित खामगाव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज आमदार श्वेताताई महाले यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली. या लक्ष्यवेधीवर जिल्ह्यातील आमदार डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड आणि डॉ. संजय रायमुलकर या चौघा आमदारांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्री दादा भुसे यांनी आगामी ३१ मार्चपर्यंत परिवहन विभागांच्या अधिकार्यांकडून रेल्वे बोर्डाकडे डी. पी. आर. सादर करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन सभागृहात दिले आहे. तसेच केंद्राने तत्वतः मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगताच, सौ. श्वेता ताई, डॉ. कुटे आणि गायकवाड आक्रमक झाले.
राज्य सरकार केवळ आश्वासनच देत आहे, असे आश्वासन बर्याचवेळा मिळाले, यावरून सत्ताधारी पक्षाचेच आमदार आक्रमक झाल्याचे सभागृहात पहायाला मिळाले. शेवटी डॉ. कुटे यांनी सांगितले की, राज्याचा वाट्यासंदर्भात निर्णय न कळविल्यास एप्रिलमध्ये केंद्राचे आर्थिक अधिवेशनात निर्णय होण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी याच अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे सोबत बैठकीची मागणी यावेळी करण्यात आली. ही मागणी परिवहन मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात मान्य केली. विशेष म्हणजे, खामगाव जालना रेल्वे मार्गाबद्दल सभागृहात पहिल्यांदाच एवढी सविस्तर चर्चा झाली असून, रेल्वे लोक आंदोलन समितीच्यावतीने चारही आमदारांचे आभार मानले आहेत.
बहुप्रतिक्षीत खामगाव – जालना रेल्वे मार्गाला राज्य शासनाकडून ५० टक्के सहभाग कधी जाहीर होणार? अशा आशयाचा प्रश्न उपस्थित करणारी लक्ष्यवेधी सूचना चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी आज सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडली. आपल्या प्रश्नात श्वेताताईंनी यापूर्वी विधानसभेत मांडलेल्या तारांकित प्रश्नाचा व मागच्या सरकारमधील परिवहन मंत्री यांनी याबद्दल घेतलेल्या बैठकीचा संदर्भ नमूद केला. केंद्र सरकारच्यावतीने या रेल्वेमार्गाचे सोपस्कार अंतिम टप्प्यात असून, राज्य सरकारने आपला ५० टक्के वाटा जाहीर केल्यास सदर रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने सुरू होईल, व त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे मागासलेपण दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. परिवहन मंत्री दादा भुसे यांनी परिवहन विभागाच्या अधिकार्यांना याबद्दल सविस्तर माहिती व आकडेवारी घेऊन अहवाल करण्याचे निर्देश देऊ व मार्च अखेरीस डिपीआर सादर होईल असे आश्वासन दिले. मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे आ. श्वेताताई महाले यांनी पुन्हा उपप्रश्न उपस्थित करून डीपीआर नेमका कधी सादर करणार ? आणि राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा कधी मंजूर करणार अशी विचारणा केली.आ. कुटे, आ. गायकवाड आणि आ. रायमुलकर यांनीही घेतला चर्चेत सहभाग घेतला होता.
आ. श्वेताताई महाले यांनी सभागृहात खामगाव – जालना रेल्वेमार्गाविषयी लक्ष्यवेधी सूचना मांडल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील अन्य तीन आमदारांनी देखील हिरीरीने सहभाग घेतला. खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विषयावर पहिल्यांदाच विधानसभेत एवढी सविस्तर चर्चा झाली आणि या चर्चेत सत्ताधारी बाकावरच्या चार आमदारांनी खिंड लढवून आपल्याच सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करून खिंडीत पकडल्याचे सुखद दृश्य आज पहायला मिळाले हे विशेष. आ. डॉ. संजय कुटे यांनी या चर्चेत सहभागी होत मार्च अखेर राज्य शासन डिपीआर सादर करणार म्हणजे नेमके कोणत्या तारखेला सादर करणार ? असा नेमका प्रश्न उपस्थित केला, शिवाय; १ एप्रिल पासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत असून तत्पूर्वी हा डिपीआर आल्यास तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आ. संजय गायकवाड यांनी देखील खामगाव – जालना रेल्वेमार्ग हा बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प असून, याला ५० टक्के निधी त्वरीत मंजूर करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी सुद्धा या रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया राज्य शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून आपला ५० टक्के वाटा मंजूर करणारे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावे, अशी मागणी केली.
परिवहन मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या उत्तरात केंद्र सरकारकडून खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिल्यानंतर राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा देण्याबाबत निर्णय घेईल असे उत्तर दिले खरे मात्र जिल्ह्यातील चारही आमदारांनी आधी राज्य शासनाने आपल्या वाट्याची ५० टक्के रक्कम मंजूर करण्यात आल्याचे हमीपत्र केंद्राला पाठवावे अशी एकमुखी मागणी केली आणि हा विषय एकत्रितपणे लावून धरला. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे लेखी उत्तर ना. दादा भुसे यांनी दिले.
रेल्वे लोकआंदोलन समितीकडून आमदारांना धन्यवाद!
बुलढाणा जिल्ह्याची विकास वाहिनी ठरणार्या खामगाव – जालना रेल्वेमार्गाविषयी विधानसभेत तळमळीने प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आणि हा महत्त्वाचा प्रश्न सभागृहात एकत्रितपणे लावून धरल्याबद्दल आ. श्वेताताई महाले, आ. डॉ. संजय कुटे, आ. संजय गायकवाड आणि आ. डॉ. संजय रायमुलकर या चौघाही आमदारांना रेल्वे लोकआंदोलन समितीने धन्यवाद दिले असून, सदर रेल्वेमार्गाचा विषय तडीस नेईपर्यंत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अशीच एकजूट कायम ठेवतील, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.