बुलढाणा (खास प्रतिनिधी) – महिला शक्तिमान आहेत. महिलाच समाजाचे मूळ आहे. येणारी पिढी स्त्री सक्षम करू शकते. ज्या समाजात स्त्रियांना समानता मिळते.तिथे विकृती व समाजाचे शोषण थांबवता येणे शक्य आहे. महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. हक्क मिळाले पाहिजे. कुटुंबातील घटकांमध्ये आर्थिक वाटा समान असला पाहिजे व कौटुंबिक सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांना संधी समान हक्क असले पाहिजे. यासाठी समाजातील सर्व घटकांना पुढाकार घेऊन स्त्रियांना हक्क दिले तरच समाजात समानता निर्माण होईल व सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे मत योगांजली योग वर्गात आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ समाजसेविका शहिनाताई पठाण यांनी व्यक्त केले.
योगांजली योग वर्गाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार डॉ. गायत्री सावजी यांना व कल्पना माने यांना स्टेट्स फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा नॅशनल टीचर इनोव्हेशन अवार्ड 2022 मिळाल्याबद्दल योगांजली योग वर्गाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पर्वावर त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून भारत मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. गायत्री सावजी यांनी स्त्रियांनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. सध्या परंपरा आणि संस्कृती बदलत आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही संस्कारक्षम पिढी घडवणे स्त्रियांच्या हातात आहे. स्त्रीयांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहेच. आता खरा लढा आहे तो स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी. त्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कल्पना माने यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हटले की विद्यार्थी हेच माझे प्रेरणा स्थान आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केल्या गेले तरच नवीन पिढी ही संस्कारक्षम उदयास येईल. त्यातूनच चांगल्या समाजाची निर्मिती होईल व समाज सुदृढ आणि सक्षम होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता महाजन यांनी केले, तर योगशिक्षिका अंजली परांजपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले याप्रसंगी गीता नागपुरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. योग वर्गातील सर्व योग महिला साधिकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.