Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

Breaking News! बारावी गणित पेपरफुटीप्रकरणाचा तपास ‘एसआयटी’कडे!

– साखरखेर्डाचे ठाणेदार काळे यांनी लावला सात आरोपींचा छडा, आरोपी १० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणात आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. तर रविवारी पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींना देऊळगावराजा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आतापर्यंत आरोपींची संख्या सातवर गेली आहे. एसआयटीचे हे पथक मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार असून, या पथकात साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे, सुरजसिंग राजपूत, प्रदीप सोभागे यासह मेहकर, लोणार, बिबी, सिंदखेडराजा येथील पोलीस कर्मचार्‍यांचा यात समावेश राहणार आहे.

दिनांक ३ फेब्रुवारी रोजी बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला, ही बातमी वार्‍याच्या वेगाने राज्यभर पसरली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात हे पेपर स्थानिक पोलिस ठाण्यात आणि तेथून परीक्षा केंद्रावर पोहोचवले जातात. असे असतानाही हा पेपर सुरू होण्याआधीच फुटल्याने परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी फोडला? याचा तपास आता सुरू झाला आहे. साखरखेडा पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून तब्बल पाच जणांना अटक केली होती. ही संख्या आता सातवर पोहोचली आहे. या प्रकरणात काल, ५ मार्चरोजी लोणार येथील खासगी शाळेवरील दोन शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना देऊळगावराजा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गणिताचा पेपर फोडायचा आहे, हे सर्व पूर्वनियोजित होते. त्यामुळे पोलिसांनी या सातही जणांवर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा, त्याचबरोबर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. अजूनही पेपर फोडणारा मुख्य आरोपी पोलीस शोधत आहेत. एक-एक कडी जोडत पेपर फोडणार्‍यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

पेपरफुटी प्रकरण विधिमंडळात गाजल्यानंतर गटशिक्षणाधिकारी गावंडे यांनी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिंदखेडराजा येथून प्रकरण साखरखेर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले होते आणि हे प्रकरण साखरखेर्डा पोलीस स्टेशनकडे येताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यावर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासचक्रे वेगाने फिरवन दुसर्‍याच दिवशी या प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आणखी दोघाजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, कमी कालावधीत कमी वेळात त्यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींचा छडा लावला आहे.

सदर पेपरफुटी प्रकरण हे गुंतागुंतीचे होत असून, या प्रकरणांमध्ये आणखीन काही नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पेपरफुटीसाठी खूपीया नावाचा व्हाट्सअप ग्रुप बनवून या ग्रुप वरती प्रश्नपत्रिकांचा फोटो टाकण्यात येत होते व ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये घेतले जात होते, अशीसुद्धा माहिती समोर येत आहे. या प्रकरणांमध्ये काही संस्थाचालकसुद्धा गुंतलेले असून, आपल्या शाळेचा रिझल्ट व मुले पास व्हावी यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचे समजते. आता स्वतंत्र तपास पथक स्थापन करण्यात आल्यामुळे या प्रकरणाला वेगाने गती येईल व आणखीन काही आरोपी ताब्यात घेतले जातील, अशी माहिती साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला दिली आहे.


दुसरीकडे, शिक्षण विभाग आपल्या चुका लपवण्यासाठी ज्या शिक्षकाने गणिताचा पेपर फुटला असल्याची पडताळणी केली त्यालाच कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक आणि पोलीस स्थानकातून प्रश्नपत्रिकांचे वितरण करणार्‍या रनरची तडकाफडकी बदली केली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर नवीन केंद्र संचालक आणि रणरची नियुक्ती करण्यात आली आहे.


असा झाला पेपर व्हायरल….!

लोणार येथील शेख अकील शेख मुनाफ यांनी सदर गणित प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो गजानन शेषराव आडे यांच्यासह अनेकांना पाठविला. त्यांनतर आडे यांनी शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे संचालक गोपाल दामोदर शिंगणे यांना पाठविला. गोपाल याने ‘खुपीया’ या व्हाटसअप ग्रूपवर तो व्हायरल केला. तो १२ वीची परीक्षा देत असलेला आदिनाथ काळूसे याच्या मोबाईलवर पेपर आला. आदित्य याच्या मोबाईलवरुन कोणीतरी पवन नागरे याला तो पेपर व्हायरल केला. पवन याने गणेश शिवानंद नागरे याला व्हायरल केला, आणि गणेश याने तो मीडियाला पाठविला. एवढ्या तपासापर्यंत पोलिसांनी पेपरफुटीच्या साखळीचा उलगडा केला आहे. या तपासात अंकुश पृथ्वीराज चव्हाण आणि शेख अकील शेख मुनाफ हे खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षक आहेत. या दोघांचा यात समावेश असून, त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. गणेश नागरे, पवन नागरे, गणेश पालवे रा.भंडारी, संस्था चालक गोपाल शिंगणे, संस्था चालक गजानन आडे किनगाव जट्टू असा सात आरोपींचा या गुन्ह्यात आतापर्यंत समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.


परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट
बारावीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीवरून ऐवढे महाभारत घडत असताना, परिसरातील काही परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरविणार्‍यांचा सुळसुळाट आज ६ मार्चला अनेक परीक्षा केंद्रावर पहावयास मिळाला. पोलिसांनी या युवकांच्या पोटर्‍या शेकल्यानंतर अनेक परीक्षा केंद्राबाहेरील युवकांनी धूम ठोकली.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!